#CoronaVirusEffect : लॉकडाऊनची अंमलबजावणी करणाऱ्या पोलिसाला दुचाकीस्वाराने फरफटत नेले , मुंबई आणि औरंगाबादच्या घटनेनंतर संताप

देशभरात जरी करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या निर्णयाची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या पोलिसांना नागरिकांच्या बेफिकीर वर्तनाचा मोठा फटका बसत आहे. औरंगाबाद येथे आज वाहतूक पोलिसाला मारहाण करण्याची घटना घडलेली असताना, मुंबईत आज पुन्हा एकदा याचा प्रत्यय आला. नाकांबदी चुकवण्यासाठी आज एका बाईकस्वाराने मुंबईतील एका सहाय्यक पोलीस निरीक्षकाला अक्षरश: फरपटत नेल्याची घटना घडलीय.
मुंबईच्या पी डिमेलो रोडवर हा प्रकार घडला. लॉकडाऊनच्या उल्लंघनाचे प्रकार रोखण्यासाठी पोलिसांनी आज ईस्टर्न फ्रीवे वाडी बंदर डोंगरी येथे नाकाबंदी केली होती. यावेळी सहायक पोलीस निरीक्षक धुरत यांनी दुचाकीवरून जाणाऱ्या दोघांना थांबण्यास सांगितलं. पोलिसांच्या तावडीत सापडल्याचं लक्षात येताच हे दुचाकीस्वार पळू लागले. हे लक्षात येताच धुरत यांनी दुचाकीचा हँडल पकडून त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र, तरीही न थांबता दुचाकीस्वाराने त्यांना फरफटत नेले. यामध्ये धुरत जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आलं आहे. करोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी सध्या देशभरात लॉकडाऊन आहे. मुंबईत करोनाचा फैलाव वाढल्यानं सरकारनं लॉकडाऊन अधिक कठोर करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच पार्श्वभूमीवर पोलिसांनी ठिकठिकाणी गस्त वाढवली आहे. विनाकारण रस्त्यावर येणाऱ्या वाहनांना आळा घालण्यासाठी नाकाबंदीही करण्यात आली आहे. मात्र, काही नागरिक अद्यापही लॉकडाऊन गांभीर्यानं घेत नसून पोलिसांशी हुज्जत घालताना दिसत आहेत. त्यातूनच आजचा प्रकार घडला आहे. अनेक ठिकाणी पोलिसांवर हल्ला झाल्याच्याही घटना घडल्या आहेत.
दरम्यान औरंगाबादच्या घटनेबाबत एका पोलीस पतीने पोलीस आयुक्तांना केलेल्या मेसेजमध्ये म्हटले आहे कि , आपल्याला हे मान्य आहे का कमिशनर साहेब, आज पोलिसांवर हात उचलण्याइतपत लोकांची हिम्मत वाढत आहे, मी आज पोलीस अधिकाऱ्याचा कुटुंबातील एक व्यक्ती आहे, आम्हाला आता जरा जास्तच काळजी वाटत आहे, पोलीसंवर हात कसे काय उचलल्या जाऊ शकतो आणि आपण पोलिसदलाचे प्रमुख असून नुसती बघ्याची भूमिका घेतायत, मला माफ करा पण हे लज्जास्पद आहे .