#CoronaEffect : सोशल मीडियावर सामाजिक तेढ निर्माण करणारी आक्षेपार्ह पोस्ट टाकणारा गजाआड

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एका विशिष्ठ धर्माच्या लोकांच्या विरोधात सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट करून धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी जामखेड पोलीस ठाण्यात राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायद्यान्वये गुन्हा दाखल करून, संबंधिताला रविवारी पोखरी (ता.आष्टी, जि. बीड) येथून अटक केली आहे. एकनाथ राजाराम शिंदे असे आरोपीचे नाव आहे. पोलीस उपअधीक्षक संजय सातव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अवतारसिंग चव्हाण यांच्या पथकाने तपास करून, या प्रकरणातील आरोपीला पोखरी येथून अटक केली आहे. असाच गुन्हा जळगाव तालुका पोलीस स्टेशन येथेही दाखल करण्यात आला असून मनोज दिलीप सपकाळे असे आरोपीचे नाव आहे.
या विषयी पोलिसांनी सांगितले कि , बीडच्या आष्टी तालुक्यातील पोखरी येथील रहिवासी असलेल्या एकनाथ राजाराम शिंदे याने व्हॉटसअॅपवरील एका ग्रुपवर एका विशिष्ट धर्माच्या लोकांकडून भाजीपाला व कसलाही माल विकत घेऊ नका, तुम्ही तुमचा मृत्यू विकत घेत आहात, लक्षात ठेवा, अशा आशयाची पोस्ट टाकली होती. तसेच फळ विक्रीचा व्यवसाय करणारे एका विशिष्ट धर्माचे दोन युवक हातगाडीवर फळे लावताना त्यातील एक जण हा प्रत्येक फळ लावण्याच्या अगोदर बोटास थुंकी लावत असल्याचा व्हिडिओ प्रसारित केला होता. ही बाब याच ग्रुपमधील सदस्य असलेल्या जामखेड तालुक्यातील लोणी येथील तरुणाच्या निदर्शनास आली. त्याने हा प्रकार तातडीने जामखेड पोलिसांच्या निदर्शनास आणून दिला. जामखेड पोलिसांनी याची गंभीर दखल घेतली व सोशल मीडियातून दोन समाजात तेढ निर्माण करण्याबरोबरच सरकारने कोविड १९ संदर्भात खोट्या अफवा पसरू नयेत, असे आदेश दिलेले असताना देखील त्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी एकनाथ शिंदे याच्या विरोधात गुन्हा दाखल केला.