कोपरगावच्या शिवसेना तालुका उप प्रमुखाची हत्या

अहमदनगरच्या कोपरगाव शिवसेनेचे उपतालुका प्रमुख सुरेश शामराव गिरे याची रविवारी संध्याकाळी सातच्या सुमारास अनोळखी व्यक्तींनी घरात घुसून गोळ्या घालून हत्या केल्याची घटना घडली. पूर्ववैमनस्यातून ही हत्या झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गिरे रविवारी संध्याकाळी सातच्या आपल्या घरात असताना एका कारमधून पाच ते सहा जण आले. ते घरात घुसले. आणि त्यांनी गिरे याच्यावर कोयत्याने सपासप वार केले. त्यानंतर रिव्हॉल्व्हरमधून त्याच्यावर गोळ्या झाडल्या. मारेकऱ्यांनी एकूण सहा गोळ्या झाडल्या. रात्री उशिरापर्यंत कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
सूत्रांनुसार, पूर्ववैमनस्यातून गिरे याची हत्या करण्यात आल्याचा संशय आहे. हल्लेखोरांनी आधी दरवाजा आणि खिडकीवर गोळीबार केला. गिरे यांनी स्वतःचा बचाव करण्यासाठी घराच्या मागील दाराने पळ काढत शेताकडे धाव घेतली. मात्र, मारेकऱ्यांनी त्याला गाठले आणि त्याच्यावर गोळ्या झाडल्या. गिरे याच्यावर अनेक गुन्हे दाखल होते आणि तो तडीपार होता. त्यानंतर तो गावी राहत होता. काही दिवसांपूर्वी मुरूम वाहतुकीतून वाद झाले होते. त्यावेळी गिरे याने एकाला मारहाण केली होती. त्यातून ही हत्या झाल्याचा संशय पोलिसांना आहे.