डॉ . बाबासाहेब आंबेडकरांऐवजी मुंबई सेंट्रलला नाना शंकरशेठ यांचे नाव , रामदास आठवले यांची पुनर्विचाराची मागणी

औरंगाबादच्या विमानतळाचे छत्रपती संभाजी महाराज असे नामकरण केल्यानंतर राज्य सरकारने आता मुंबईतील पश्चिम रेल्वे मार्गावरील मुंबई सेंट्रल रेल्वे स्टेशनच्या नामांतराला मंजुरी दिली आहे. मुंबई सेंट्रल टर्मिनसचं नाव ‘नाना शंकरशेठ टर्मिनस’ स्टेशन करण्याचा ठराव बहुमताने मंजूर करण्यात आला आहे. केंद्र सरकारने शिक्कामोर्तब केल्यानंतर हे नाव प्रत्यक्षात येईल. दरम्यान मुंबई सेंट्रल रेल्वे टर्मिनसला ‘नाना शंकरशेठ’ यांचे नाव देण्याच्या ठरावाचा राज्य सरकारने पुनर्विचार करावा, मागणी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे. मुंबई सेंट्रलला डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव द्यावे आणि ग्रँट रोडला नाना शंकर शेठ यांचे नाव देण्याची सूचना रामदास यांनी यापूर्वीच केली होती. मुंबई सेंट्रल रेल्वे टर्मिनस हे पश्चिम रेल्वेवरील महत्वाचे टर्मिनस असल्यामुळे या टर्मिनसला डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात यावी, अशी मागणी मागील १५ वर्षांपासून रिपब्लिकन पक्षाने केली होती. मात्र, आता अचानक राज्य सरकारने मुंबई सेंट्रल रेल्वे टर्मिनसला नाना शंकर शेठ यांचे नाव देण्याचा ठराव संमत केल्याने रामदास आठवले यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
मुंबई सेंट्रल रेल्वे टर्मिनसला डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात यावे ही आंबेडकरी जनतेची, रिपब्लिकन पक्षाची अनेक वर्षांपासून मागणी आहे. मुंबईत व्हिटी स्टेशनला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देण्यात आले आहे. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देण्यात आले आहे. मुंबई सेंट्रलला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात यावे, अशी आंबेडकरी जनतेची मागणी आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार, आधूनिक भारताचे निर्माते, समतेचे मानव अधिकाराचे जागतिक स्तरावरील महान क्रांतिसूर्य म्हणून त्यांचे योगदान युगप्रवर्तक ठरले आहे. त्यामुळे मुंबई सेंट्रल सारख्या महत्वपूर्ण रेल्वे टर्मिनसला डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी रामदास आठवले यांनी केली आहे. याबाबत रामदास आठवले केंद्रीय रेल्वे मंत्री पियुष गोयल यांची भेट घेणार आहेत.
नाना शंकरशेठ हे मुंबईचे आद्य शिल्पकार मानले जातात. त्यांना ‘भारतीय रेल्वेचे पितामह’ असेही संबोधले जाते. व्यवसायाने उद्योजक असलेल्या नाना शंकरशेठ यांचा मुंबई शहराच्या जडणघडणीत मोठा वाटा मानला जातो. त्यामुळे शिवसेनेने ही मागणी गेल्या अनेक वर्षांपासून उचलून धरली होती. मुंबईत आतापर्यंत ‘एल्फिन्स्टन रोड’चं ‘प्रभादेवी’, व्हिक्टोरिया टर्मिनसचं (व्हीटी) छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसटी) असं नामकरण करण्यात आलं आहे.