अॅट्रॉसिटी प्रकरणात माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांचा अटकपूर्व जमीन अर्ज फेटाळला

औरंगाबादेत पानटपरी चालकाला जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी दाखल अॅट्रॉसिटीच्या गुन्ह्यात माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी दाखल केलेला अटकपूर्व जामीन अर्ज विशेष न्यायाधीश अभिनंदन पाटणंगणकर यांनी फेटाळला.असल्याने जाधव यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
माजी आमदार हर्षवधन जाधव यांच्या विरोधात या प्रकरणात पानटपरी चालक नितीन रतन दाभाडे (वय ३०, रा. बनेवाडी) यांनी तक्रार दिली होती. तक्रारीनुसार, दाभाडे यांनी जिल्हा न्यायासमोरील सिग्नल जवळ पानटपरी सुरू केली व तेथे निळा झेंडा लावला. २९ फेब्रुवारी २०२० रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास हर्षवर्धन जाधव तेथे आले. त्यांनी ज्या जागी टपरी व निळा झेंडा लावला ती जागा माझ्या मालकीची आहे. त्यामुळे टपरी व झेंडा हटव, असे दाभाडे यांना सांगितले. त्यामुळे दोघांमध्ये वाद झाला व जाधव यांनी दाभाडे यांना जातीवाचक शिवीगाळ करून टपरी व झेंडा हटवला नाही, तर जीवे मारीन अशी धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकारानंतर रविवारी रात्री दाभाडे यांनी क्रांतीचौक पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून हर्षवर्धन जाधव यांच्या विरुद्ध अॅट्रॉसिटीच्या कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
या गुन्ह्यात अटक होऊ नये यासाठी जाधव यांनी अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला असता, सहाय्यक लोकाभियोक्ता अजीत अंकुश यांनी गुन्ह्याचा तपास प्राथमिक अवस्थेत असून आरोपीला जामीन दिल्यास तो फिर्यादीवर दबाव आणू शकतो, त्यामुळे आरोपीला जामीन देण्यात येवू नये, अशी विनंती न्यायालयाकडे केली. ही विनंती मान्य करून न्यायालयाने आरोपीचा जामीन फेटाळला.