धावत्या रिक्षात विद्यार्थीनीचा विनयभंग करण्याचा प्रयत्न

उल्हासनगरमध्ये, धावत्या रिक्षात विद्यार्थीनीचा विनयभंग करण्याची घटना घडली आहे. मात्र या तरुणीने धावत्या रिक्षामधून उडी मारुन स्वत:चा बचाव केला आणि पोलीस स्थानकात धाव घेतली. तरुणाविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे.
शनिवारी सकाळी नऊच्या सुमारास २१ वर्षीय तरुणी कॅम्प नंबर एक परिसरातून धुनिचन कॉलेज रस्त्यावरुन क्लासला जात होती. क्लासला जाण्यासाठी या तरुणीने उल्हासनगर स्थानकाकडे जाणारी शेअर रिक्षा पकडली. यावेळी आधीच रिक्षामध्ये एक २० ते २५ वर्षीय वयाचा तरुण तोंडाला रुमाल बांधून बसला होता. रिक्षा सुरु झाली आणि ती काही अंतरावर जाताच तो त्या तरुणीजवळ येऊन तिच्याशी अंगलट करु लागला. घाबरलेल्या तरुणीने रिक्षा चालकाला रिक्षा थांबवण्यास सांगितले. मात्र रिक्षाचालकही या तरुणासोबत असल्याने त्याने रिक्षा थांबवण्याऐवजी वेग वाढवला. घाबरलेली तरुणी या तरुणाच्या तावडीतून आपली सुटका करण्यासाठी धडपड करु लागली. रिक्षा थांबत नसल्याने या तरुणीने रिक्षाचा वेग कमी होताच धावत्या रिक्षातून खाली उडी मारली आणि आरडाओरड केला. तिचा आवाज ऐकून आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांनी तिच्या मदतीसाठी धाव घेतली. त्यावेळी त्या तरुणाने रिक्षात बसून पळ काढला. या तरुणीने पोलीस स्थानकात धाव घेऊन तरुणाविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे.