Sad News : आर्थिक चणचणीचा सामना करणाऱ्या उद्योजकाने मुलांचा गळा घोटून स्वतःही केली आत्महत्या !!

नवी दिल्लीत एका उद्योजकाने आर्थिक चणचण , बेरोजगारी आणि नैराश्याला कंटाळून स्वतःच्या दोन मुलांची हत्या करून मेट्रो ट्रेनसमोर उडी मारुन जीवन संपवले. रविवारी ही दुर्देवी घटना घडली. मधुर मालानी (४४) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. दिल्लीच्या शालीमार बाग परिसरात हे कुटुंब राहत होते. सहा महिन्यापूर्वी बंद पडलेली फॅक्टरी पुन्हा सुरु करण्यासाठी मधुर यांचे प्रयत्न सुरु होते. परंतु त्याच्या प्रयत्नाला यश मिळत नव्हते. अखेर आर्थिक चणचणीतून त्यांनी हा निर्णय घेतला असल्याचे सांगण्यात येत आहे.
या विषयीची अधिक माहिती अशी कि , आर्थिक चणचणीचा सामना करणाऱ्या या कुटुंबाला मधुरचे आई-वडिल पैशांची मदत करत होते. मधुर यांना एक मुलगी आणि मुलगा होता. पोलिसांनी घरी प्रवेश केला, त्यावेळी दोन्ही मृतदेह बिछान्यावर पडलेले होते. मधुर यांनी गळा आवळून दोन्ही मुलांची हत्या केल्याची शक्यता आहे. पोलिसांनी मधुर यांचा शोध सुरु केला. पण पोलीस त्यांच्यापर्यंत पोहोचण्याआधीच मधुर यांनी ५.४० च्या सुमारास हैदरपूर मेट्रो स्टेशनवर आत्महत्या केली. मालानी यांच्या मृतदेहाजवळ किंवा त्यांच्या घरी कुठलीही चिठ्ठी सापडलेली नाही. मधुर यांची पत्नी रुपाली बाजारात गेलेली असताना ही घटना घडली. “मी घरी आली तेव्हा मुले मृतावस्थेत होती व पती घरामध्ये नव्हता” असे रुपालीने पोलिसांना सांगितले. मालानी यांनी दुपारी मुलांची हत्या केली त्यानंतर आत्महत्या केल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासातून समोर आले आहे. मुलांच्या मृत्यूचे नेमके कारण पोलिसांनी अजून स्पष्ट केलेले नाही. शवविच्छेदन अहवालातूनच नेमके कारण स्पष्ट होईल असे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.
दरम्यान घटनास्थळावर कोणतीही सुसाइड नोट सापडली नाही. मलानी आर्थिक संकटात सापडले होते आणि सहा महिन्यांपूर्वी सॅंड-पेपर उत्पादन कारखाना बंद झाल्यानंतर ते तणावात होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मधुर मालानी आपली पत्नी रुपाली, मुलगी समिक्षा (१४) आणि सहा वर्षांचा मुलगा श्रेयांश यांच्यासह दिल्लीच्या शालीमार बाग भागात राहत होते. सायंकाळी ५ वाजून ४० मिनिटांनी शालिमार बाग पोलिसांना आत्महत्येची माहिती मिळाली, तर सायंकाळी ६ वाजून ५० मिनिटांनी मुलांच्या हत्येची माहिती मिळाली, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. मधूर यांची पत्नी दुपारी तीन वाजता जवळच्या बाजारात गेल्याचे रूपालीने पोलिसांना सांगितले. मात्र जेव्हा ती परत आली तेव्हा तिला दोन्ही मुलांचा मृतदेह दिसला आणि पती तिथे नव्हते. या प्रकरणात तपास सुरू असल्याची माहिती पोलीस उपायुक्त (उत्तर पश्चिम) विजयंत आर्य यांनी दिली.