विनायक मेटेंनी दिला शिवस्मारक समिती अध्यक्षपदाचा राजीनामा दिला

छत्रपती शिवाजी महाराज स्मारक प्रकल्प अंमलबजावणी, देखरेख व समन्वय समितीचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे.
तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अरबी समुद्रातील शिवस्मारकासाठी समिती स्थापन केली होती. २०१५ पासून विनायक मेटे हे या समितीचे अध्यक्ष म्हणून काम पाहत आहेत. आता मात्र, राज्यात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचे सरकार आल्याने त्यांच्या विचारानुसार विकासाची कामे होणे अपेक्षित आहे. तसेच शिवस्मारकाचे कामही उद्धव ठाकरे यांच्या विचारानुसारच व्हायला हवे. त्यामुळे मी समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे, असे मेटे यांनी राजीनामा पत्रात म्हटले आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली स्मारकाचे काम लवकरात लवकर होईल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली असून भविष्यातही सरकारला सहकार्य करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.