हिंगणघाट पाठोपाठ सिल्लोड मध्येही महिलेला जिवंत जाळण्याचा प्रयत्न , आरोपीला सोमवारपर्यंत पोलीस कोठडी

वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथील शिक्षिकेच्या जळित प्रकरणावरून संतप्त प्रतिक्रिया उमटत असताना औरंगाबादच्या सिल्लोड येथे एका महिलेला रॉकेल ओतून पेटवून देण्यात आले असून या घटनेचे संपूर्ण महाराष्ट्रातून पडसाद उमटत आहेत. दरम्यान औरंगाबादमधील जळीत कांड हे पीडित महिला आणि आरोपीच्या वैयक्तिक संबंधातून झाल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज येथे दिली. वर्ध्यानंतर ही घटना उघकीस आल्याने संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला आहे. यामध्ये पीडित महिला ९५ टक्के भाजली असल्याचं सांगण्यात येत आहे. औरंगाबादच्या सिल्लोड तालुक्यातील अंधारी गावातील ही घटना आहे.
गृहमंत्री देशमुख म्हणाले कि , पीडित महिला आणि आरोपीचे वैयक्तिक संबंध होते आणि त्यांच्यातील वादातून ही दुर्देवी घटना घडली. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास करत असल्याचंही सूत्रांनी सांगितलं. सिल्लोड तालुक्यातील अंधारी येथे सोमवारी संतोष मोहिते या ५० वर्षीय व्यक्तिने पीडित महिलेवर रॉकेल ओतून तिला पेटवून दिले होते. ही महिला एकटीच राहते. ती सोमवारी घरी एकटीच असताना मोहिते तिच्या घरी आला. ‘तू रात्री-अपरात्री का येतो, तुझ्यामुळे माझी समाजात बदनामी झाली आहे’ असे ती त्याला म्हणाली. त्यावरून दोघांमध्ये भांडण झाले व संतप्त आरोपी संतोषने तिला शिवीगाळ व मारहाण करीत घरातील कॅनमधील रॉकेल तिच्या अंगावर टाकून तिला पेटवून दिले आणि आरोपी पळून गेला होता मात्र या प्रकरणी पोलिसांनी आरोपी संतोष मोहिते याला अटक केली आहे. भादंवि 307, 323, 452, 504 आणि ऍट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी संतोष मोहिते हा याच गावात राहणारा असून तो गावात बिअर बार चालवतो. या प्रकरणात आरोपी संतोष सखाराम मोहिते याला मंगळवारी (४ फेब्रुवारी) अटक करून न्यायालयात हजर केले असता, आरोपीला सोमवारपर्यंत (१० फेब्रुवारी) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश जिल्हा व सत्र न्यायाधीश एम. एस. देशपांडे यांनी दिले.
या प्रकरणी सिल्लोड तालुक्यातील ५० वर्षीय पीडित महिलेने फिर्याद दिली होती. फिर्यादीनुसार, संबंधित पीडित महिला एकटीच राहते व तिच्या दोन्ही मुलींचे लग्न यापूर्वीच झाले आहेत. २ फेब्रुवारी २०२० रोजी रात्री ११ वाजता फिर्यादी घरात एकटीच असताना गावातील आरोपी संतोष सखाराम मोहिते (५०) हा तिथे आला व त्याने फिर्यादीच्या घराचे दार वाजवले. दार उघडताच समोर आरोपी संतोष दिसल्यामुळे, ‘तू रात्री-अपरात्री का येतो, तुझ्यामुळे माझी समाजात बदनामी झाली आहे’ असे ती त्याला म्हणाली. त्यावरून दोघांमध्ये भांडण झाले व संतप्त आरोपी संतोषने तिला शिवीगाळ व मारहाण करीत घरातील कॅनमधील रॉकेल तिच्या अंगावर टाकून तिला पेटवून दिले आणि आरोपी पळून गेला.