अभिव्यक्ती : मंत्रालयातील दालन क्रमांक ६०२ आणि पत्रकारांची भंपकगिरी…

प्रसार माध्यमे कधी कुठल्या गोष्टीची चर्चा करतील सांगता येत नाही. सध्या मंत्रालयातील मंत्रालयातील सहाव्या माळ्यावर मुख्यमंत्र्यांच्या शेजारी असलेल्या दालन क्रमांक ६०२ वरून अशीच भंपकगिरी महाराष्ट्रातील माध्यमांनी सुरु केली आहे. हे दालन शापित असल्याच्या बातम्या प्रसिद्ध करून संपूर्ण मंत्रालयाला आणि मंत्रिमंडळालाच अंधश्रद्धेच्या खाईत लोटले आहे. आणि विशेष म्हणजे या बातम्या लावून देण्यात हे वार्ताहर आणि त्यांची माध्यमे या फालतू चर्चेला प्रसिद्धी देत आहेत. स्वतःच याबाबत मंत्र्यांना प्रश्न विचारून भंडावून सोडत आहेत.
विशेष म्हणजे मंत्रालयाशी संबंधित अनेक प्रश्न असताना रिकाम्या वार्ताहरांनी अशा विषयवार पोरकट बातम्या द्याव्यात हे पत्रकारितेला शोभण्यासारखे नक्कीच नाही. अशा सुमार दर्जाचे पत्रकार असतील तर पुरोगामी महाराष्ट्राला हे कुठे घेऊन जाणार असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही.
यांनी या दालनाविषयीच्या अशा बातम्या दिल्यानंतर आधीच कर्मकांडी आणि अंध श्रद्धाळू असलेले मंत्री अधिकच अंधश्रद्धाळू होत असल्याचे केविलवाणे आणि पुरोगामी महाराष्ट्रासाठी अत्यंत लज्जास्पद असे हे चित्र आहे. माध्यमांनी दिलेल्या या बातम्यांनुसार ६०२ क्रमांकाच्या या दालनाबाबत मात्र अनेकांकडून नकारघंटा वाजवली जात आहे. प्रसिद्ध बातम्यांनुसार यामागे त्या दालनाबद्दल नेत्यांच्या मनात असलेली भीती असल्याचे म्हटले आहे. ६०२ नंबरच्या या दालनाबद्दल एक गैरसमज पसरविला जात आहे कि , या दालनात जो मंत्री बसतो तो आपला कार्यकाल पूर्ण करू शकत नाही, किंवा त्याचे निधन होते. मग काय इतर सर्व दालनातील सर्व मंत्र्यांची मंत्रीपदे कायम राही काय ? किंवा इतर दालनात बसलेल्या मंत्र्यांचे निधन झाले नाही ? अशा प्रकारच्या बातम्या म्हणजे मूर्खपणाचा कळस आहे.
विशेष म्हणजे अशा बातम्यांमनमुळे मंत्रालयाच्या ६ व्या मजल्यावर असलेलं हे दालन अद्याप कोणाला देण्यात आलेलं नाही. या दालनामध्ये एक कॉन्फरन्स रूम, कार्यालयीन कर्मचाऱ्यांसाठी हॉल आणि दोन मोठ्या केबिन आहेत. सुरुवातीला या दालनात मुख्यमंत्री, वरिष्ठ मंत्री आणि मुख्य सचिव बसत होते पण आता मात्र याकडे नको असलेलं दालन म्हणून पाहिलं जातं.
मनकवड्या पत्रकारांनी दिलेल्या बातम्यांनुसार विलासराव देशमुख , आर आर पाटील , छगन भुजबळ , अजित पवार , एकनाथ खडसे , अनिल बोन्डे , अर्जुन खोतकर, सदाभाऊ खोत आदी आठ मंत्र्यांना अनंत अडचणींना आणि पराभवाला सामोरे जावे लागले आहे . अशी अवस्था काय इतर दालनातील मंत्र्यांची झाली नाही काय ? असा प्रश्न साहजिकच उपथित होतो. म्हणे हे दालन एकनाथ खडसे यांना मिळाले होते. ते कृषी, महसूल आणि अल्पसंख्यांक कल्याण विभागाचं कामकाज बघायचे. पण खडसे यांना २ वर्षातच राजीनामा द्यावा लागला. त्यांच्यानंतर कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांना हे कार्यालय दिलं गेलं. त्यांचा दोन वर्षांनी हृदयविकाराने मृत्यू झाला. यानंतर हे दालन कोणालाही देण्यात आलं नाही. २०१९ मध्ये भाजपचे अनिल बोंडे यांच्याकडे कृषीमंत्रीपद देण्यात आले. तेव्हा हेच दालन बोंडेना दिले होते. त्यानंतर झालेल्या विधानसभेत बोंडेंचा पराभव झाला. यानंतर ६०२ नंबरच्या दालनाबाबतचा समज आणखी वेगाने पसरला. मग ६०१ मध्ये बसलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ” मी पुन्हा येईन..” म्हणतानाही त्यांना सत्तेतून बाहेर व्हावे लागले याला काय त्यांचे दालन जबाबदार आहे काय ?
दरम्यान या दिवट्या वार्ताहरांनी असेही वृत्त दिले आहे कि , महाविकास आघाडीत उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतलेल्या अजित पवार यांनीही याआधी ६०२ क्रमांकाच्या दालनात बसून काम केलं आहे. त्यांनीसुद्धा इथं काम करण्यास नकार दिल्याचीही चर्चा रंगत होती. राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार नुकताच पार पडला. यावेळी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. त्यानंतर दालन स्वीकारत असताना अजित पवार यांनी मंत्रालयातील ६०२ क्रमांकाचं दालन नाकारल्याच्या आणि मुख्य सचिव सीताराम कुंटे यांचे दालन घेतल्याच्या बातम्या देण्यात येत होत्या.
विशेष म्हणजे अंधश्रद्धेतूनच अजित पवार यांनी हा निर्णय घेतल्याच्या बातम्याही या वार्ताहरांनी देऊन त्यांना याबाबत थेट प्रश्नही विचारला, हा प्रश्न येताच अजित पवार अक्षरशः भडकून म्हणले कि , ‘मी कोणतंही दालन नाकारलं नाही. मुख्यमंत्र्यांनी ज्येष्ठतेनुसार दालनाचं वाटप केलं आहे. आपण आता २१ व्या शतकात आहोत. अंधश्रद्धेतून दालन नाकारण्याचा विषय नाही. पवार कुटुंब कधीही अंधश्रद्धा मानत नाही. स्वत: शरद पवार यांनी कधीही अंधश्रद्धा मानली नाही. आम्ही त्याच प्रकारची भूमिका घेतो,’ असं स्पष्टीकरण अजित पवार यांनी म्हटले आहे.
दरम्यान मंत्रिमंडळ विस्तारानंतर लवकरच हे दालन एखाद्या मंत्र्याला देण्यात येईल असे सामान्य प्रशासन विभागाने सांगितले आहे. एकूण ४३ मंत्र्यांना दालने देण्यात येत असून मंत्र्यांच्या आवडीनिवडीनुसार सर्वांना दालने देण्यात येत असल्याचे सामान्य प्रशासन विभागाचे अधिकारी म्हणाले.