काँग्रेस कार्यकर्त्यांनीच फोडले काँग्रेसचे कार्यालय , आमदार संग्राम थोपटे यांच्या कार्यकर्त्यांचा प्रताप

काँग्रेस आमदार संग्राम थोपटे यांना मंत्रिपद न दिल्याने त्यांच्या समर्थकांनी शिवाजीनगर येथील काँग्रेस कार्यालयाची तोडफोड करीत पक्षांविरुद्धचा आपला संताप व्यक्त केला. पुणे शहर व जिल्हा कार्यालय शिवाजीनगर येथे एकाच इमारतीत आहेत. तेथे घोषणाबाजी करत आलेल्या या कार्यकर्त्यांनी तोडफोड केली. संग्राम थोपटे हे भोर वेल्हा मुळशीचे आमदार आहेत.
महिनाभराच्या प्रतीक्षेनंतर महाविकास आघाडीच्या एकूण ३६ आमदारांना मंत्रिपदाची शपथ देण्यात आली. मात्र ज्यांना मंत्रिपद देण्यात आले नाही असे अनेक आमदार नाराज आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश सोळंके यांच्या नाराजीनाट्यावर आज मंगळवारी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी मनधरणी केल्यावर पडदा पडला. तोच ही पुण्यातली घटना घडली. संग्राम थोपटे यांनी मंत्रिपद न मिळाल्याने हे कार्यकर्ते नाराज आहेत. या नाराजीतून त्यांनी शिवाजीनगर येथील शहर काँग्रेस कार्यालयाची तोडफोड केली.
महाविकास आघाडीच्या निर्मितीचे शिलेदार शिवसेनेचे खा. संजय राऊत यांच्या भावाचाही मंत्रिमंडळात समावेश न झाल्याने ते सुद्धा नाराज आहेत. मंत्रिमंडळाच्या शपथविधीलाही त्यांनी दांडी मारली परंतु आम्ही नाराज नाही, आम्ही पक्षासाठी काम करतो , पदासाठी नाही अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी काल व्यक्त केली होती.
दरम्यान पुण्यात झालेल्या या राड्याबद्दल काँग्रेस सहसचिव कीर्ती भोसले यांनी या संपूर्ण प्रकाराबद्दल माहिती दिली. त्या म्हणाल्या, ‘आम्ही चौघे जण कार्यालयात होतो. यावेळी पक्षाचे शहर प्रवक्ते रमेश अय्यर, ब्लॉक अध्यक्ष सचिन आडेकर आणि कर्मचारी पोपट पाटोळे हे तिघे बाहेर होते. वर्षाखेर असल्याने लवकर कार्यालय बंद करून निघण्याच्या बेतात होतो. अचानक बाहेरून घोषणांचा आवाज आला. कार्यकर्ते निदर्शने करून निघून जातील असे वाटले होते. मात्र अचानक त्यांनी दगडफेक आणि तोडफोड करण्यास सुरुवात केली. शहराध्यक्ष रमेश बागवे यांच्या कार्यालयातील खुर्च्या, टेबलवरच्या काचा, खिडक्या फोडल्या. दगड मारून टीव्हीही फोडला. मी घाबरून आतल्या छोट्या खोलीत जाऊन टेबल खाली लपले म्हणून मला दुखापत झाली नाही. मात्र संतप्त कार्यकर्त्यांनी खोलीची विभागणी करणारी काचेवर दगड मारला होता.’