जन्मठेपेची शिक्षा भोगणारा कैदी मेहबूब पठाणचा मृत्यू

परभणी शहरात दहशत माजविणाऱ्या खुनाच्या गुन्ह्यात हर्सूल जेलमध्ये जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला कुख्यात गुंड मेहबूब पठाणचा औरंगाबाद येथे रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना बुधवार २५ डिसेंबर रोजी घडली.
मेहबूब खॉ आजम खॉ पठाण (वय ४५ वर्ष रा. रहीम नगर परभणी) याच्या विरोधात २००३ मध्ये नवा मोंढा पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल होता. मेहबूब पठाणला सदर प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा झाली होती. सुरुवातीला नागपूर जेलमध्ये असलेला महेबुब पठाण कालांतराने जेलमधून पसार झाला. हैद्राबाद मार्गे परभणीत आल्यावर २०१६ मध्ये परभणी पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्यानंतर त्याची रवानगी औरंगाबाद येथील हरसुल जेलमध्ये करण्यात आली. जेलमध्ये प्रकृती खालावल्याने वैद्यकीय अधिका-याच्या सल्याने त्याला घाटी रुग्णालयात नेण्यात आले. या ठिकाणी डॉक्टरांनी तपासून मेहबूब पठाणला मृत घोषित केले. त्याच्या पश्चात एक मुलगी, दोन मुले , आई-वडील, पत्नी असा परिवार आहे. रात्री उशीरापर्यंत महेबुब पठाणचा मृतदेह परभणीत आला नव्हता.