चर्चेतली बातमी : एनआरसी साठी सर्वेक्षणासाठी आलेल्यांना तुमचे नाव ” रंगा -बिल्ला ” पत्ता ७ रेसकोर्सरोड असा सांगा : अरुंधती रॉय

सुधारीत नागरीकत्व कायदा आणि एनआरसी विरोधात सुरू असलेल्या आंदोलनात लेखिका आणि सामाजिक अरुंधती रॉय यांनीही उडी घेतली आहे. आज दिल्लीत बोलताना वादग्रस्त वक्तव्य केले. एनपीआर सर्वेक्षणाच्या वेळी आपले नाव रंगा बिल्ला सांगा, असे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले. रॉय यांच्या वक्तव्यामुळे आता वाद होण्याची शक्यता आहे.
दरम्यान भाजपनेते शिवराजसिंह चव्हाण यांनी अरुधंती रॉय यांच्या या वक्तव्यावर टीका केली असून त्यांनी म्हटले आहे कि , अशा बुद्धिजीवींचे सुद्धा स्वतंत्र रजिस्टर असायला हवे. असे वक्तव्य करताना अरुंधती रॉय यांना लाज वाटायला हवी.
अरुंधती रॉय आज दिल्लीत सुधारीत नागरिकत्व कायदा विरोधी आणि एनआरसी विरोधी आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. त्यावेळी त्यांनी बोलताना सरकारवर टीका केली. एनपीआरसाठी माहिती घेण्यास कोणी आल्यास त्यांना आपला पत्ता आणि नाव खोटं सांगावे असे आवाहन त्यांनी केले.
सर्वेक्षणास आलेल्यांना तुम्ही आपले नाव रंगा बिल्ला असे सांगून आपला पत्ता ७ रेस कोर्स असे सांगण्याचे आवाहन त्यांनी केले. आपण फक्त लाठी आणि गोळी खाण्याससाठी आंदोलन करत नसून विचारपूर्वक कृती करण्याची आवश्यकताअसल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. एनआरसीच्या मुद्यावर पंतप्रधान मोदी देशासोबत खोटं बोलत असल्याचाही आरोप त्यांनी केला. राष्ट्रीय जनगणना नोंदणी (एनपीआर) हे राष्ट्रीय नागरिकता नोंदणी (एनआरसी) साठी डेटाबेस तयार करण्याचे काम करणार आहे. त्यामुळे एनपीआरदेखील विरोध करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.