Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

तब्ब्ल १० वर्षानंतर आज भारतात दिसणार अनोखे सूर्य ग्रहण , अंधश्रद्धा सोडून सावल्यांचा हा खेळ बिनधास्त पाहण्याचे आवाहन

Spread the love

तब्बल दहा वर्षानंतर आज दिनांक २६  डिसेंबरला सकाळी आठ ते अकरा या वेळेत भारतातील खगोलप्रेमींना  कंकणाकृती सूर्यग्रहण दिसणार आहे. या पूर्वी २२ जुलै २००६ रोजी मध्य आणि उत्तर भारतातून खग्रास सूर्यग्रहण, तर १५ जानेवारी २०१० रोजी देशाच्या काही भागात कंकणाकृती सूर्यग्रहण दिसले होते. मुंबईत सकाळी ८:०४ ते १०.५५ वाजता सूर्यग्रहण पाहता येईल. मात्र महाराष्ट्रात संपूर्ण सूर्य झाकला जाणार नाही असे सांगण्यात येत आहे.

दरम्यान मात्र वेधशाळेच्या अंदाजानुसार, अनेक भाग ढगाळ राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे सूर्यग्रहण दिसण्याची शक्यता कमी आहे. ढगांचा पडदा वेळीच दूर झाला, तरच  हा सावल्यांचा खेळ पाहता येईल.

यावर्षी भारतात कर्नाटकतील काही भाग, केरळ आणि तामिळनाडू या दक्षिणेकडच्या राज्यात अरुंद मार्गिकेत हे ग्रहण सूर्योदयानंतर पाहता येणार आहे. तर, उर्वरित देशभरात हे ग्रहण खंडग्रास स्थितीत दिसेल. दक्षिण भारतात कन्ननूर, कोईम्बतूर, कोझीकोडे, मदुराई, मेंगलोर, उटी, तिरुमलापल्ली आदी भागात हे ग्रहण कंकणाकृती स्वरुपात दिसेल. भारताबरोबरच नेपाळ, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, भुतान, चीन आणि ऑस्ट्रेलिया या देशांमध्ये कंकणाकृती सूर्यग्रहण दिसणार आहे.

शास्त्रानुसार  जेव्हा चंद्र हा सूर्य व पृथ्वीच्या मध्ये येतो तेव्हा पृथ्वीवर चंद्राची सावली पडते. या सावलीतून दिसणाऱ्या स्थितीला सूर्यग्रहण म्हणतात. सूर्यग्रहणाबद्दल फार पूर्वीपासून नोंदी ठेवलेल्या आढळतात. सूर्यग्रहण सर्व साधारणपणे अमावास्येच्या आसपास दिसते. कंकणाकृती सूर्यग्रहण हे जेव्हा चंद्र पृथ्वीपासून त्याच्या सर्वाधिक लांब अंतरावर राहून सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये येऊन सूर्याच्या प्रकाशाला झाकून टाकतो तेव्हा कंकणाकृती सूर्यग्रहण दिसते. या सूर्यग्रहणाचं वैशिष्ट्य म्हणजे फायर रिंग किंवा कंकणाकृती सूर्यग्रहण दिसणार आहे. चंद्रबिंबामुळे संपूर्ण सूर्य झाकोळला जाणार नाही. सूर्याची कडा मोकळी राहील म्हणून ती प्रकाशमान रिंग कंकणाकृती दिसेल. ग्रहणाची ही अवस्था दक्षिण भारतात काही ठिकाणी दिसणार आहे.

या सूर्यग्रहणात चंद्र जास्त अंतरावर असल्यामुळे तो सूर्याला पूर्णपणे झाकू शकत नाही. अशावेळी सूर्याची वर्तुळाकार कडी चंद्राच्या पाठीमागे दिसते. सूर्याकडून येणाऱ्या प्रखर आणि अतिनील किरणांमुळे (अल्ट्रा व्हायोलेट) डोळ्यांना इजा होऊ नये म्हणून ग्रहण उघड्या डोळयांनी पाहू नये. यासाठी बाजारात मायलर फिल्मपासून तयार करण्यात आलेले चष्मे वापरावे. यांची किंमत रुपये २०० पासून असते. सध्या बाजारात ग्रहण पाहण्यासाठी विशिष्ठ प्रकारचे चष्मेही  मिळतात. त्याचबरोबर घरात जर वेल्डिंगसाठी वापरण्यात येणारी काच असेल तर या काचेचा वापर करूनही तुम्ही कंकणाकृती सूर्यग्रहण पाहू शकता. सूर्यग्रहण पाहण्यासाठी कायम सुरक्षित पद्धतींचाच वापर करण्याची गरज आहे.

सूर्यग्रहण, चंद्रग्रहणाच्या संदर्भात अनेक अंधश्रद्धा सांगितल्या जातात  गरोदर मतांनी या काळात भाजी चिरली की गर्भाचे ओठ फाटणार, बोटे जुळविली तर गर्भाची बोटे जुळणार, पापण्या मिटविल्या तर डोळ्यात व्यंग येणार अशा अनेक अंधश्रद्धांचे पसरवल्या जातात.  ग्रहण चालू असताना त्यामुळे  ग्रहणाच्या  काळात  जेवायचे नाही , ग्रहण पाहू नये असे सांगून या काळात मंदिरांचे दरवाजेही बंद ठेवण्यात येतात. मात्र हा नैसर्गिक आविष्कार असल्यामुळं या अंधश्रध्दांवर विश्वास न ठेवता, लोकांनी बिनधास्तपणे या विलोभनीय खेळाचा आनंद घ्यावा असे शास्त्रज्ञ सांगतात.

पूर्वेला क्षितिजापासून थोडं वर सूर्यग्रहण दिसणार आहे. नुसत्या डोळ्यांनी ग्रहण पाहू नये. प्रखर सूर्यकिरणांनी डोळ्याला इजा होऊ शकते.  सूर्यग्रहण पाहण्याचा खास चश्मा किंवा काळ्या काचेतून ते पाहावं. सलग सूर्याकडे पाहू नये. ही काळजी घेऊन ग्रहण पाहिल्यामुळे कुणाला काहीही अपाय होत नाही.

मुंबईच्या नेहरू तारांगणाचे संचालक आणि विज्ञान प्रसारक डॉ. अरविंद परांजपे यांनी न्यूज १८ ला दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत साधारण ८ ते ११ या वेळात सूर्यग्रहण दिसेल. चंद्राच्या सावलीने संपूर्ण सूर्य झाकला जाण्याची अवस्था दिसणार नाही. महाराष्ट्रातून दिसणाऱ्या ग्रहणात सूर्याचा ५० ट्क्क्यांहून अधिक भाग झाकला जाईल. मुंबईत ही ग्रहणमध्याची स्थिती साधारण ९ वाजून २२ मिनिटांनी होईल. त्यावेळी जास्तीत जास्त सूर्यबिंब चंद्रबिंबामुळे झाकलेलं दिसेल. सकाळी १० वाजून ५५ मिनिटांनी सूर्यग्रहण पूर्णपणे सुटेल.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!