केंद्र सरकारचा दावा खोटा , एनपीआर हे एनआरसी लागू करण्यासाठी उचलले गेलेले पहिले पाऊल : काँग्रेस

Once again the BJP govt is caught in a trap of their own making.
2018-19 Annual Report of the Union Home Ministry clearly states NPR is first step to NRC.
Also in 2014 former MoS Home Ministry Kiren Rijiju replied to a question in RS stating the same.
Who's lying now? pic.twitter.com/ljpMIsZz5H
— Congress (@INCIndia) December 24, 2019
राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी (एनपीआर)ला आज केंद्रीय मंत्रिमंडळाने मान्यता दिल्यानंतर या मुद्यावर काँग्रेसने भाजपवर टीका केली आहे. एनपीआर हे एनआरसी लागू करण्यासाठी उचलले गेलेले पहिले पाऊल असल्याचे गृहमंत्रालयाच्या अहवालात नमूद केले असल्याचा दावा काँग्रेसने केला आहे. एनपीआरला मंजुरी दिल्यानंतर एनआरसीसोबत त्याचा काहीही संबंध नसल्याचे स्पष्टीकरण केंद्र सरकारच्यावतीने करण्यात आले. मात्र, केंद्र सरकारचा हा दावा खोटा असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे. राज्यसभेत विचारलेल्या एका प्रश्नाचे उत्तर देताना गृह मंत्रालयाने एनपीआर आणि एनआरसीबाबत स्पष्टीकरण दिले असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे.
काँग्रेसने याबाबत म्हटले आहे कि , भाजप पुन्हा एकदा आपल्याच जाळ्यात अडकले असून गृहमंत्रालयाच्या वर्ष २०१८-१९ च्या अहवालात एनपीआर हे एनआरसी लागू करण्यापूर्वीचे पहिले पाऊल असल्याचे म्हटले आहे. त्याशिवाय २०१४ मध्ये तत्कालीन गृहराज्यमंत्री किरण रिजीजू यांनीदेखील राज्यसभेत हेच उत्तर दिले असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे. त्यामुळे खोटं कोण बोलत आहे, हे दिसून येत असल्याचे काँग्रेसने म्हटले.
दरम्यान पंतप्रधान मोदी यांनी रविवारी जाहीर सभेत बोलताना एनसीआर अंमलबजावणीबाबत कोणतीही चर्चा झाली नसल्याचा दावा केला होता. तर, गृहमंत्री अमित शहा यांनी एनआरसीची अंमलबजावणी होणार असल्याचे अनेकदा म्हटले होते. देशात सध्या एनआरसी व एनपीआरवरून संभ्रम असून लोकांमध्ये भीती पसरली आहे. या संबंधी केंद्र सरकारची स्पष्ट भूमिका मांडताना एनआरसी आणि एनपीआर या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत. या दोन्हींचा कोणताही दुरान्वये संबंध नाही. सध्या एनआरसीचा मुद्दा हा चर्चेचा मुद्दा नसून २००४ मध्ये एनपीआर कायदा हा यूपीए सरकारने बनवला होता. २०१० मध्ये याची जनगणना करण्यात आली होती. त्याचप्रमाणे यावेळीही होत आहे. हा कायदा भाजपा सरकारने सुरू केलेला नाही, असा खुलासा गृहमंत्री अमित शहा यांनी एएनआय या वृत्त संस्थेला दिलेल्या मुलाखतीत केला आहे.