Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

शरद पवार यांच्या लढ्यातूनच आम्हाला प्रेरणा मिळाली , झारखंडचे भावी मुख्यमंत्री  हेमंत सोरेन यांची प्रतिक्रिया, रविवारी शपथविधी

Spread the love

महाराष्ट्रापाठोपाठ भाजपाने झारखंडमधील सत्ताही गमावली  असून या निवडणुकीत झारखंड मुक्ती मोर्चा, काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दल यांच्या आघाडीला यश मिळवले आहे. याबद्दल  राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी  हेमंत सोरेन यांना निवडणुकीतील यशाबद्दल शुभेच्छा दिल्यानंतर  हेमंत सोरेन यांनी प्रतिक्रिया देताना, महाराष्ट्रातील तुमच्या लढ्याद्वारे आम्हाला प्ररेणा मिळाली असल्याचे म्हणत शरद पवार यांचेही  आभार व्यक्त केले. झारखंड निवडणुकीत झामुमो व आघाडीला मिळालेल्या यशाबद्दल हेमंत सोरेनजी आपले अभिनंदन. झारखंडमधील जनमतामुळे भगवी लाट ओसरण्यास सुरुवात झाल्याच्या पॅटर्नला अधोरेखित केलं आहे, असं शरद पवार यांनी ट्विद्वारे म्हटले होते.

सोमवारी देखील पूर्ण निकाल येण्यापूर्वी निकालाचा कल पाहून शरद पवार यांनी झारखंडच्या निकालावर भाष्य करताना  “महाराष्ट्र, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगडनंतर आता झारखंडमधूनही भाजपा हद्दपार झाला आहे, भाजपाला लागलेली ही उतरती कळा आता कोणीही थांबवू शकणार नाही,” असे भाकीत केले होते. दरम्यान विधानसभा निवडणुकीत झारखंड मुक्ती मोर्चा, काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दल यांच्या आघाडीने ४७ जागा जिंकत राज्यात सरकार आणले तर, झारखंड विधानसभा निवडणुकीत ६५ जागा जिंकण्याचे लक्ष्य ठेवणाऱ्या भाजपला केवळ २५ जगावर समाधान मानावे लागले.

दरम्यान भाजपला पराभवाचा धक्का देत झारखंडची सत्ता खेचून आणणारे झारखंड मुक्ती मोर्चा-काँग्रेस-राष्ट्रीय जनता दल आघाडीचे नेते हेमंत सोरेन यांनी आज सत्तास्थापनेचा दावा केला. सोरेन यांनी राज्यपाल द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली व त्यांच्याकडे ५० आमदारांच्या पाठिंब्याचं पत्र सुपूर्द केले .  रविवार दि. २९ डिसेंबर रोजी रांचीतील मोरहाबादी मैदानात शानदार सोहळ्यात हेमंत सोरेन मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत.

हेमंत सोरेन यांनी राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव, काँग्रेसचे झारखंड प्रभारी आर. पी. एन. सिंह आणि झारखंड विकास मोर्चाचे नेते बाबूलाल मरांडी यांच्यासह राज्यपालांची भेट घेतली. मरांडी यांच्या पक्षाला तीन जागा मिळाल्या आहेत. या तीन आमदारांचे बळ मिळाल्यानेच सोरेन यांनी अर्धशतक पूर्ण केले आहे. त्यामुळेच राज्यपालांच्या भेटीनंतर सोरेन यांनी माध्यमांशी संवाद साधताना आपल्या नेतृत्वाखाली स्थापन होणाऱ्या सरकारला ५० आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा केला. राज्यपालांच्या आमंत्रणावरून २९ डिसेंबर रोजी दुपारी एक वाजता रांचीत शपथविधी सोहळा पार पडेल. या सोहळ्याला राष्ट्रीय स्तरावरील विविध नेत्यांना तसेच मुख्यमंत्र्यांना आमंत्रित करण्यात येईल, असे सोरेन म्हणाले. झारखंडमधील सत्तावाटपाबाबत तपशीलवार चर्चा काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी व माजी अध्यक्ष राहुल यांच्यासोबत होईल. या चर्चेत फॉर्म्युला निश्चित करण्यात येईल, असेही आर. पी. एन. सिंह व सोरेन यांनी स्पष्ट केले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!