‘तुम्ही आम्हा सर्वांना ठार मारणार का?’ सिने अभिनेते प्रकाश राज यांचा व्हिडिओद्वारे पंतप्रधानांना सवाल

https://twitter.com/prakashraaj/status/1208727137106087938
देशात नागरिकत्व सुधारणा कायद्याला होत असलेला विरोध मोडून काढण्यासाठी सरकार बाळाचा वापर करून आंदोलन चिरडून टाकण्याचा प्रयत्न करीत असल्याने या पार्श्वभूमीवर सिने अभिनेते प्रकाश राज यांनी एक व्हिडिओ ट्विटरवर शेअर करत मोदी सरकारवर टीका केली आहे. ‘तुम्ही आम्हा सर्वांना ठार मारणार का?’ असा जाहीर प्रश्न त्यांनी विचारला आहे.
या व्हिडीओमध्ये नागरिकत्व दुरुस्ती कायदा आणि एनआरसीबाबतदेखील ते प्रश्न विचारताना आणि सरकारवर टीका करताना दिसत आहेत. याशिवाय त्यांनी अलीकडेच ट्विट करत पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना सवाल केला आहे. ‘ माननीय पंतप्रधानजी आणि माननीय गृहमंत्रीजी तुम्हाला जनतेने दिलेल्या अधिकारांचा तुम्ही त्याच जनतेविरोधात असा निरंकुश वापर करणार आहात का? तुम्ही आम्हा सर्वांना ठार मारणार आहात का? ‘ असं विचारत त्यांनी आंदोलनाचा व्हिडिओही शेअर केला आहे.
प्रकाश राज यांनी या पूर्वीही पंतप्रधान नरेंद्र मोदींवर एनआरसीच्या मुद्द्यावरून निशाणा साधला आहे. प्रिय पंतप्रधान, राष्ट्रीय नोंदणीकृत बेरोजगार, संकटातले शेतकरी, शिक्षणाशिवाय मुले, बेघर गरीब… ही आपली प्राथमिकता असू नये काय?’ असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.
दरम्यान नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात देशभर आंदोलन पेटलेले असताना बॉलिवूडचे कलाकारदेखील या कायद्याविरोधात आपली मते मांडताना दिसत आहेत. अभिनेते कमल हासन यांनी ट्विटरच्या माध्यमातून सरकारवर टीका केली होती. ‘संसदेत बहुमत मिळवले म्हणजे आपल्या देशाची सामाजिक घडी विस्कटविण्याचा अधिकार तुम्हाला मिळाला असं समजू नका. नागरिकत्व कायद्यानंतर आता ‘एनआरसी’चं खुळ त्यांच्या डोक्यात आहे. दस्तऐवजांच्या आधारावर किंवा त्याअभावी आपण एखाद्या व्यक्तीचे देशातील अस्तित्व सिद्ध करू शकत नाही किंवा नाकारूही शकत नाही. ही दडपशाही संपेपर्यंत माझा लढा संपणार नाही. ‘ अशा शब्दात त्यांनी सरकारी धोरणाचा निषेध केला.