Aurangabad Crime : वामन हरी पेठे ज्वेलर्स प्रकरणी फायनान्स कंपन्यांची चौकशी !

औरंगाबाद : वामन हरी पेठे ज्वेलर्स प्रकरणात आरोपींकडून २३ किलो सोने जप्त केल्यानंतर पुढील तपासासाठी सोने तारण ठेऊन कर्ज देणा-या मुथुट आणि मण्णपुरम फायनान्सला चौकशीला बोलावण्याचा विचार पोलिस आयुक्तालयात होत असल्याची माहिती वरिष्ठ सुत्रांनी सोमवारी दिली आहे.
समर्थनगरातील वामन हरी पेठे ज्वेलर्समधून पेढीचा व्यवस्थापक अंकुर राणे याला हाताशी धरुन राजेंद्र जैन, त्याचा भाचा लोकेश जैन यांनी ६५ किलो सोने लंपास केल्याप्रकरणी ३ जुलै रोजी क्रांतीचौक पोलिस ठाण्यात प्रकाश पेठे यांच्या तक्रारीवरून गुन्ह दाखल झाला होता. या प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे असून, पोलिस निरीक्षक श्रीकांत नवले यांनी फायनान्स कंपन्यांकडून आतापर्यंत २३ किलो सोने जप्त केल्याची माहिती आहे. अशातच खंडपीठाने तिन्ही आरोपींना मंजूर केलेला जामीन फेटाळला आहे.
या प्रकरणात आरोपींच्या वकीलांनी बाजू मांडताना ही चोरी नसून, व्यवहार असल्याचे पुरावे कोर्टात सादर केले होते. सरकारी वकील आणि बचाव पक्षाचा युक्तीवाद ऐकल्यानंतर खंडपीठाने आरोपींना जामीन देण्याचे आदेश दिले होते. तसेच आरोपींचा जामीन रद्द होण्यासाठी पोलिस प्रयत्न करत होते. न्यायालयाच्या भूमिकेनंतर आर्थिक गुन्हे शाखेने याप्रकरणात कायदेशीर सल्ला घेण्याचा मानस वरिष्ठ पोलिस अधिका-यांना बोलून दाखवला. कारण मूथूट आणि मण्णपुरम या सोने तारण ठेवून कर्ज देणा-या कंपन्या चोरीचे सोने घेऊन कर्ज देत असल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. पुणे गुन्हे शाखेने एका वेगळ्या प्रकरणात सोने तारण ठेवणा-या मुथुट आणि मण्णपुरम फायनान्स कंपन्यांच्या अधिका-यांना आरोपी केल्याची माहिती औरंगाबाद पोलिसांना मिळाली आहे. म्हणून मण्णपुरम आणि मुथुट फायनान्स कंपन्यांची चौकशी करणे योग्य असल्याचे तपास अधिका-यांचे म्हणणे आहे.