नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधातील आंदोलनाचा भडका , बस बरोबरच पोलीस चौकीला लावली आग…

मोदी सरकारने केलेल्या नागरिकत्व सुधारणा कायद्यावरून राजधानीत दिल्लीत आंदोलनाचा वणवा अधिकच भडकला आहे. सोमवारी झालेल्या राड्यानंतर आज मंगळवारीही हे आंदोलन अधिक तीव्र झाले. सिलमपूर परिसरात प्रदर्शन करणाऱ्या लोकांनी पोलीस चौकी जाळली. सोबतच पोलीसांनी उभारलेले अडथळे तोडून त्यालाही आगी लावल्या. काही बाईक्सही जाळण्यात आल्या त्यामुळे अतिरिक्त सुरक्षा दल तैनात करण्यात आले आहे. जामिया मीलीया विद्यापीठात झालेल्या हिंसाचार प्रकरणानंतर विद्यार्थ्यांचा उद्रेक मोठ्या प्रमाणात वाढला असून देशभर त्याचे लोण पसरत आहे. देशातल्या अनेक राज्यातील विद्यापीठांमध्ये विद्यार्थ्यांनी मोर्चे काढून आपला निषेध व्यक्त केला.
दरम्यान दिल्लीतील आंदोलकांना आवरण्यासाठी आणि जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. पोलिसांनी केलेल्या कारवाईत काही आंदोलक जखमी झाल्याचे म्हटले जात होतं. मात्र पोलिसांनी गोळीबार केलेला नाही असे दिल्ली पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
जामियानगरनंतर आज सीलमपूर-जाफराबाद भागात आंदोलनाला हिंसक वळण लागलं. निदर्शकांनी दिल्ली परिवहन सेवेच्या तीन बसेसची तोडफोड केली असून दगडफेकीत अनेक पोलीस जखमी झाले आहेत. स्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना अश्रूधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या. दरम्यान, संपूर्ण परिसरात तणावाचे वातावरण असून खबरदारीचा उपाय म्हणून सात मेट्रो स्थानके बंद करण्यात आली आहेत.
जामिया विद्यापीठात पोलिस आणि विद्यार्थी यांच्यात झालेल्या धुमश्चक्रीनंतर आता दिल्ली पोलिसांनी मोठा खुलासा केला आहे. जामिया मिलिया विद्यापीठात नागरिकत्व सुधारणा कायद्याला विरोध करण्यासाठी सुरु केलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागलं होतं. यावेळी पोलिसांनी लाठीचार्ज केला होता. यात काही विद्यार्थी जखमी झाले होते. त्यानंतर मंगळवारी पोलिसांनी दहा जणांना अटक केली असून यात एकही विद्यार्थी नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
दरम्यान, दिल्लीचे अतिरिक्त पोलिस आयुक्त कुमार ज्ञानेश यांनी जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठात पोलीस आणि विद्यार्थ्यांमध्ये झालेल्या धुमश्चक्रीबाबत धक्कादायक खुलासा केला आहे. आंदोलक पुर्वतयारी करून आंदोलनात उतरले होते. त्यांच्याकडे भिजलेली ब्लँकेट होती. अश्रुधुरांच्या नळकांड्या फोडताच त्यावर टाकण्यासाठी त्यांचा वापर आंदोलकांनी केला. आंदोलन शांततेनं होते तर मग ब्लँकेट भिजवून कसे काय आणलं याचा तपास केला जात आहे. हे नक्कीच उत्स्फुर्तपणे नव्हतं तर सर्वकाही पुर्वनियोजित होतं असं ज्ञानेश कुमार यांनी म्हटले आहे.