महाराष्ट्रातील सत्तांतरावरून कवित्व चालूच …मोदी -पवारांच्या भेटीचे अर्धसत्यच पवारांनी सांगितले, उर्वरित भाग योग्य फोरमवर बाहेर येईल : देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्राच्या सत्ता स्थापनेवरून सुरु झालेले कवित्व अद्यापही चालूच आहे. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दिल्ली भेटीतील वृत्तांत कथन केल्यानंतर भाजपकडून उत्तर येणे अपेक्षितच होते आणि आहे . विशेष म्हणजे शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसबरोबर ऐतिहासिक आघाडी करत सरकार स्थापनेचा घाट घातला जात होता, तेव्हाच मोदी-पवार भेट झाली होती. या भेटीत नरेंद्र मोदींनी सुप्रिया सुळेंना मंत्रिपदाची ऑफर दिली होती, असा गौप्यस्फोट शरद पवारांनी काही दिवसांपूर्वी एका वृत्त वाहिनीशी केला होता. पण हे अर्धसत्य असल्याचा दावा आता माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
या भेटीबद्दल शरद पवार यांनी सांगितलं ती पूर्ण माहिती नाही. त्याआधी आणि नंतर काय बोलणं झालं हे कुणाला माहिती नाही, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. पंतप्रधान मोदींबरोबरच्या भेटीत शरद पवारांनी सांगितल्याप्रमाणे झालं, पण त्यातला अर्धा भाग बाहेर आलेला नाही. ते पूर्णसत्य नाही. मोदी- पवार संवादातला काही भाग अद्याप बाहेर आलेला नाही. तो योग्य फोरमवर बाहेर येईल, असा दावा फडणवीस यांनी केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनीच आपल्यापुढे युतीचा प्रस्ताव ठेवला होता, असे शरद पवारांनी उद्धव ठाकरेंचं सरकार स्थापन झाल्यावर सांगितले. शरद पवार म्हणाले की, “पंतप्रधानांना भेटण्याची वेळ मी आधीच मागितली होती. मात्र ते जमू शकलं नाही. शेवटी पंतप्रधान कार्यालयाने वेळ दिली. संभ्रम निर्माण व्हावा अशी पंतप्रधान कार्यालयाची इच्छा असावी. मात्र मला त्याची काळजी नव्हती.”
शरद पवार यांनी एका मुलाखतीत हा गौप्यस्फोट केला होता. सुप्रिया सुळे यांना मंत्रिपदाचीही ऑफर भाजपने दिली होती, असे पवार म्हणाले होते. याविषयी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, “त्या बैठकीला मी नव्हतो. त्यामुळे मी त्याबद्दल आत्ता भाष्य करणार नाही. पण तिथे काय झालं याची मला माहिती आहे. योग्य वेळी योग्य व्यासपीठावर मी त्याबद्दल बोलेन.”