देवेंद्र फडणवीस यांची योग्य वेळ : अजित पवारांबद्दल केला हा मोठा खुलासा…

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्याबद्दल योग्य वेळ आल्यानंतर बोलेन असे राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले होते . हि वेळ साध्य विरोधी पक्षनेतेपदाची धुरा हाती घेतल्यावर भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्यांदाच गेल्या महिन्याभरातील राज्यातील सत्तानाट्यावर मोठा खुलासा केला आहे.
‘काँग्रेस आणि शिवसेनेसोबत सरकार चालवणे शक्य नाही. भाजपसोबतच सरकार स्थापन केले पाहिजे, असे मी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना सांगितले आहे. शरद पवार यांना या गोष्टीची कल्पना दिली आहे, असे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी आम्हाला सांगितले होते . त्यामुळेच आम्ही त्यांच्यासोबत सत्तास्थापन केली,’ असा गौप्यस्फोट देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. ‘आम्ही राष्ट्रवादीकडे गेलोच नव्हतो. तर अजितदादाच आमच्याकडे आले होते,’ असा दावाही त्यांनी केला आहे.
एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांनी अनेक गौप्यस्फोट केले आहेत. अजित पवार यांच्या मदतीने सत्ता स्थापन करण्यापूर्वी त्यांनी अनेक आमदारांशी माझं बोलणे करून दिले होते , असे सांगतानाच अजित पवार यांच्यावर विश्वास ठेवून सरकार स्थापन्याचा घेतलेला निर्णय योग्य होता की अयोग्य हे योग्य वेळ आल्यावरच सांगेन असे ते पुन्हा म्हणाले. तसेच सत्ता स्थापनेच्या रात्री नेमके काय घडले हे सुद्धा योग्यवेळी सांगितल्या जाईल, असेही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले .
भाजपने राष्ट्रवादी काँग्रेससोबत ‘डील’ केल्याची जोरदार चर्चा होती. त्यावरही त्यांनी भाष्य केलं. सत्ता स्थापन करण्यासाठी आमची कुणाशीही ‘डील’ झाली नव्हती. डीलच करायची असती तर अडीच-अडीच वर्षाचा फॉर्म्युला आम्ही मान्य केला असता, असेही फडणवीस म्हणाले.
शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांना अहंकाराचा दर्प जडला होता. त्यामुळेच त्यांचा पराभव झाल्याची टीका केली होती. त्यालाही फडणवीस यांनी उत्तर दिलं. ‘मी पुन्हा येईन’ ही कवितेची साधी ओळ आहे. निवडणूक प्रचारावेळी तिचा मी उल्लेख केला. लोकांना ही ओळ आवडली. त्यात कोणताही गर्व नव्हता आणि कसला दर्पही नव्हता,’ असे फडणवीस म्हणाले. गेल्या पाच वर्षात एकही सुट्टी न घेता जनतेची सेवा केली, याचा आनंद असल्याचेही त्यांनी सांगितलं. मला माझ्या मर्यादा आणि क्षमता माहीत आहेत. त्यामुळे निवडणुकीत आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावावरच मते मागितली, असे ही त्यांनी एका प्रश्नाचं उत्तर देताना सांगितले.