महाराष्ट्राचे राजकारण : अजित पवारांची मनधरणी करण्याचे प्रयत्न : आ. नवाब मलिक

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या मनधरणीचे प्रयत्न अद्याप सुरू असल्याची माहिती राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली. तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी ५१ आमदारांच्या सह्याचे पत्र घेऊन राजभवन गाठले परंतु, राज्यपाल दिल्लीत असल्याने त्यांची भेट होऊ शकली नाही.
दरम्यान सर्वोच्च न्यायालयात राष्ट्रवादीने ४१ आमदारांच्या सह्यांचे पत्र सादर केले तर पक्षाचे प्रवक्ते आ. नवाब मलिक त्यांच्याकडे ५१ आमदारांच्या सह्यांचे पत्र असल्याचे सांगतात त्यामुळे सध्या राष्ट्रवादीकडे नेमके किती आमदार आहेत हा प्रश्नच आहे .
राजभवनात राज्यपालांना भेटण्यासाठी गेलेले जयंत पाटील राज्यपालांना न भेटताच परतले आहेत. याबद्दल बोलताना जयंत पाटील म्हणाले कि , अजित पवार यांना भेटून त्यांची मनधरणी करण्यात येईल, त्यांना पुन्हा पक्षात आणले जाईल. अजित पवार यांना पुन्हा पक्षात आणण्यासाठी पवार कुटुंबीयाकडून प्रयत्न सुरू असल्याची माहिती आहे. शरद पवार आणि सुप्रीया सुळे यांनी अजित पवार यांचे भाऊ श्रीनिवास यांच्याशी चर्चा केल्याची माहिती आहे. सध्या शरद पवार यांच्या निवासस्थानी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक सुरू आहे. काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात यांच्यासह राष्ट्रवादीचे नेते उपस्थित आहेत. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा यासाठी पवार कुटुंबीयाकडून प्रयत्न सुरू आहे.