Politics Of Maharashtra : कोण काय म्हणाले ? : पवार म्हणाले उद्धव ठाकरेंच्या नावावर संमती , काँग्रेसचे मात्र मौन , चव्हाण म्हणाले पवारांच्या माहितीवर भाष्य नाही

शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राचं मुख्यमंत्री व्हावं यावर सहमती झाली आहे. शरद पवार यांनी बैठकीच्या बाहेर आल्यानंतर ही माहिती दिली आहे. मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांचं नाव आम्ही पुढे केलं आहे. तिन्ही पक्षांनी यासाठी सहमती दर्शवली आहे. नेतृत्त्व कोणी करायचं हा आमच्या समोरचा अजेंडा नाही असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे. तसंच उद्या पत्रकार परिषद होण्याची शक्यता आहे असंही पवार यांनी स्पष्ट केलं.
उद्धव ठाकरे हे नव्या सरकारचे मुख्यमंत्री असतील. त्यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन होईल, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी माध्यमांना दिली असली तरी काँग्रेसने मात्र त्यावर मौन पाळून सस्पेन्स वाढवला आहे. शरद पवार यांनी माध्यमांना जी माहिती दिली आहे त्यावर मला कोणतंही भाष्य करायचं नाही, असे काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले तर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचे राजकीय सल्लागार अहमद पटेल यांनीही मुख्यमंत्रिपदाबाबत आताच काही सांगता येणार नाही, असे सांगत वेळ मारून नेली.
दरम्यान उद्धव ठाकरेंनी जर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होण्यास नकार दिला तर संजय राऊत यांच्या नावाला शरद पवारांनी पसंती दर्शवली होती असेही सांगण्यात येत आहे. संजय राऊत यांनी ही महाविकास आघाडी घडवण्यात मोठी भूमिका बजावली आहे. भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी महाविकास आघाडी स्थापन झाली आहे आणि काही दिवसातच महाविकास आघाडीचं सरकार स्थापन होऊ शकतं. दरम्यान शरद पवार या बैठकीतून त्यांच्या काही खासगी कामासाठी बाहेर पडले आहेत. त्यांनी बाहेर पडताच उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होतील यावर आमच्या मनात काहीही शंका नाही असंही शरद पवार यांनी स्पष्ट केलं.
शरद पवार बैठकीतून बाहेर पडल्यानंतर काही वेळाने उद्धव ठाकरेही बैठकीच्या बाहेर पडले. त्यांनी मात्र कोणतेही वक्तव्य केले नाही. सगळ्या मुद्द्यांवर चर्चा झाली की आम्ही तुम्हाला माहिती देऊ असं उद्धव ठाकरेंनी प्रसारमाध्यमांना सांगितलं आहे. अडीच अडीच वर्षांचा काही फॉर्म्युला ठरला आहे का? असा प्रश्न विचारला असता “नेतृत्त्वाबाबत कोणताही प्रश्न आमच्या कुणाच्याही मनात नाही. उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री व्हावं यावर सहमती झाली आहे” अशी माहिती शरद पवार यांनी महाविकास आघाडीच्या बैठकीबाहेर पडल्यानंतर दिली.