ज्येष्ठ पत्रकार निळकंठ खाडिलकर यांचे निधन, “नवाकाळ” चा काळ हरवला…

ज्येष्ठ पत्रकार नीळकंठ खाडिलकर यांचे आज पहाटे अल्पशा आजाराने निधन झाले. ते ८५ वर्षांचे होते. त्यांच्यावर लीलावती रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांच्या पार्थिवावर आज दुपारी मरीन लाइन्स येथील चंदनवाडी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत. खाडिलकर रोड गिरगाव येथील दैनिक नवाकाळच्या कार्यालयात दुपारी १२ ते २ दरम्यान त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे.
नीळकंठ खाडिलकर यांचा जन्म ६ एप्रिल १९३४ रोजी झाला होता. खाडिलकर हे दैनिक नवाकाळचे अनेक वर्षं संपादक होते. या काळात महत्त्वाच्या घडामोडींवर त्यांनी अग्रलेखांमधून भाष्य केलं. अग्रलेखांचा बादशहा म्हणून त्यांची ओळख होती. अर्थशास्त्र हा विषय घेऊन ते बी.ए. ऑनर्स झाले होते. ज्येष्ठ नाटककार आणि ‘केसरी’ चे माजी संपादक कृ. प्र. खाडिलकर यांचे ते नातू होते. खाडिलकर हे एक उत्तम मुलाखतकार होते. त्यांनी घेतलेल्या अनके मुलाखती अतिशय गाजल्या.
नीलकंठ खाडिलकर यांनी आपल्या तर्कशुद्ध आणि संदर्भासहित लेखनातून इतिहासाची मांडणी करत वाचकांचे प्रबोधन केले आणि त्याचवेळी वर्तमान सामाजिक-राजकीय परिस्थितीचे अभ्यासू व विवेकी विवेचनही वाचकांपर्यंत पोहचविले.
” प्रॅक्टिकल सोशॅलिझम “च्या माध्यमातून त्यांनी भाई नगर्सेकर आणि इतर तरुणांच्या मदतीने संघटन बांधण्याचासुद्धा प्रयत्न केला होता.