Aurangabad Crime : जालना जिल्ह्यातून आणलेले चंदन विक्री करताना चंदनचोर अटकेत

औरंगाबाद : जालना जिल्ह्यातून चोरलेले चंदन घेऊन ते व्यापा-यांना विकण्यासाठी आलेल्या एकाला स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी अटक केली आहे. रिजवान इलियास खान (रा. आडगाव माऊली) असे चंदनचोराचे नाव आहे. त्याच्याकडून दुचाकीसह पोत्यातील चंदन असा ७५ हजारांचा ऐवज पोलिसांनी हस्तगत केला आहे.
स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिका-यांना रिजवान हा दुचाकीवर चंदन घेऊन जाणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यावरुन पथकाने अंजनडोह ते लाडसावंगी रस्त्याच्या बाजूला सायंकाळी सातच्या सुमारास सापळा रचला. पोलीस निरीक्षक भागवत फुंदे यांच्या मार्गदर्शनाखालची हि कारवाई करण्यात आली.
रिजवानची दुचाकी येताच पोलिसांनी त्याला थांबवले. त्याच्या दुचाकीच्या मागे असलेल्या पोत्यात पोलिसांना चंदनाचे ३० किलोचे खोड आढळले. पोलिसांनी त्याबाबत चौकशी केल्यावर त्याने जालना जिल्ह्यातील फाजलवाडीतून चंदन चोरल्याची कबुली दिली. आडगाव माऊली या गावात साठा करुन मागणीनुसार चंदनाची विक्री केली जात असल्याचेही त्याने सांगितले. त्याला जालना पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
…..
नऊ लाखांचा गुटखा पकडला
औरंगाबाद : वेरुळमध्ये अवैधरित्या पान मसाला व गुटख्याचा साठा करुन ठेवलेल्या गोडाऊनवर धाड मारत पोलिसांनी नऊ लाख ८० हजारांचा माल पकडला. ४ नोव्हेंबर रोजी हि कारवाई करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक संदीप सोळंके यांना प्रकाशचंद पांडे यांच्या दुकानात त्यांचा नातेवाईक स्वप्नील पांडे (रा. अंधानेर, ता. कन्नड) याने पान मसाला व सुगंधीत तंबाखूचा साठा करुन ठेवल्याची माहिती मिळाली होती. त्यावरुन पथकाने गोडाऊनवर छापा टाकला. त्यात नऊ लाख ८० हजारांचा माल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी खुलताबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
……