Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

महाराष्ट्राचं राजकारण : शिवसेना आपल्या विधानावर ठाम , ‘मुख्यमंत्रिपद’ आणि ‘ठरल्याप्रमाणे’ होणार असेल तरच तयार : संजय राऊत

Spread the love

राज्याच्या राजकारणातील महायुतीचे घटक पक्ष भाजप आणि शिवसेना यांच्यात सत्ता स्थापनेवरून बरेच वाद-प्रतिवाद चालू आहेत कालच्या मुख्यमंत्र्यांच्या विधानानंतर शिवसेनेने तीव्र प्रतिक्रिया दिली होती. आज भाजपने नरमाईची सूर केल्यानंतर संजय राऊत यांनी आपली प्रतिक्रिया देताना म्हटले आहे कि , या दोन्ही पक्षांनी सोबत राहण्यातच महाराष्ट्राचं हित आहे. अर्थात  सगळं काही ठरल्याप्रमाणे झालं तर राज्याला निश्चितच पाच वर्षे स्थिर सरकार मिळेल.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज भाजप विधिमंडळ नेतेपदी निवड झाली. यावेळी बोलताना राज्यात पुन्हा एकदा महायुतीचंच सरकार येणार, असे ते म्हणाले. त्याकडे लक्ष वेधले असता राऊत यांनी फडणवीसांच्या भूमिकेचे स्वागत केले.

या विषयावर बोलताना राऊत पुढे म्हणाले कि , ‘मुख्यमंत्रिपद’ आणि ‘ठरल्याप्रमाणे’ यावर आम्ही बोलत आहोत. येथे व्यक्ती नाही तर महाराष्ट्र महत्त्वाचा आहे. ज्याच्याकडे १४५ हा बहुमताचा आकडा आहे तो कोणीही नेता वा आमदार या राज्याचा मुख्यमंत्री होऊ शकतो, अशी टोलेबाजीही राऊत यांनी पुन्हा यावेळी केली.

सर्वात मोठा पक्ष म्हणून उद्या राज्यपाल एखाद्या पक्षाला सत्ता स्थापनेचं निमंत्रण देतीलही पण त्यांनाही बहुमत सिद्ध करावंच लागेल, असे राऊत म्हणाले. यावेळी महाराष्ट्राची कुंडली आम्हीच बनवणार आहोत. या कुंडलीत कोणते ग्रह कुठे बसवायचे, कोणते तारे जमिनीवर उतरवायचे, कोणते चमकवायचे हे शिवसेना ठरवणार आहे, असे सांगत राज्यातील सत्तासंघर्षात शिवसेनाच किंगमेकरच्या भूमिकेत असल्याचा पुनरूच्चार राऊत यांनी केला.

सध्या विधिमंडळ पक्षाच्या जोरदार बैठका सुरू आहेत. त्या एकदाच्या संपू द्या. शिवसेनेला कोणतीही घाई नाही. आता शांतपणाने, थंड डोक्याने महाराष्ट्राच्या हिताचा विचार करून पुढचे निर्णय घ्यावे लागणार आहेत आणि आम्ही ते निश्चितच घेऊ. त्यासाठी आमचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सक्षम आहेत, असे राऊत यांनी स्पष्ट केले.

आज शिवसेना नेत्यांची बैठक झाली. या बैठकीत ‘जे जे शक्य असेल ते सर्व करणार’, अशी भूमिका उद्धव यांनी घेतल्याचे वृत्त आहे. याबाबत तुम्ही काय सांगाल, असे विचारले असता, उद्धव ठाकरे जो निर्णय घेतील व जो आदेश देतील त्याचे पालन करणारे आम्ही सारे शिवसैनिक आहोत, असे राऊत म्हणाले. शिवसेना विधिमंडळ पक्षनेतेपदासाठी आदित्य ठाकरे, एकनाथ शिंदे आणि सुभाष देसाई यांची नावे चर्चेत असल्याबाबत विचारले असता अशा पुड्या सोडण्याची गरज नाही. शिवसेनेत अशी कुणाची नावे चर्चेत नसतात. येथे पक्षप्रमुखांच्या आदेशानेच सारे निर्णय होतात, असे राऊत म्हणाले.

शिवसेनेचे २३ आमदार भाजपसोबत जाऊ शकतात, अशी चर्चा आहे. त्याबाबत विचारले असता हा आकडा कुठून आणला? मग ५७ आमदार संपर्कात आहेत असंच का नाही म्हणत, असा सवाल राऊत यांनी केला. आता तुम्ही पुडी सोडताय म्हणून मी सुद्धा पुडी सोडतोय. आज सकाळपासून भाजपचे साठेक आमदार आम्हाला संपर्क साधताहेत!, अशी टोलेबाजीही राऊत यांनी केली. याक्षणी महाराष्ट्रातील एकाही पक्षाचा एकही आमदार फुटणार नाही, ही माझी खात्री असल्याचेही राऊत पुढे म्हणाले.

शिवसेनेने वेगळ्या पर्यांयांचा अद्याप विचार केलेला नाही. निकालाच्या दिवशी उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत जे सांगितलं त्यावर शिवसेना ठाम आहे. भाजप-शिवसेनेत जे ठरलंय त्यानुसार सगळं काही व्हायला हवं. तसं लेखी आश्वासन भाजपने द्यायला हवं, एवढीच आमची मागणी असल्याचेही राऊत यांनी पुन्हा स्पष्ट केले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!