Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Maharashtra Politics : चर्चेतली बातमी : उपमुख्यमंत्रीपद आणि १३ मंत्रीपदे शिवसेनेला देण्याचा भाजपचा नवा “फॉर्म्युला “

Spread the love

भाजपने आज विधी मंडळ नेतेपदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची निवड ठरल्याप्रमाणे झाल्यानंतर गेल्या काही दिवसांपासून “मुख्यमंत्रिपद” आणि  “सत्तेत समान वाटा” या मागणीवर शिवसेना आग्रही असतानाच, भाजपनं शिवसेनेसमोर सत्तावाटपाचा नवा फॉर्म्युला ठेवला आहे.  त्यानुसार शिवसेनेला उपमुख्यमंत्रिपद आणि १३ अन्य मंत्रिपदे देण्याबाबतचा प्रस्ताव भाजपनं ठेवला असल्याचे वृत्त आहे. तर मुख्यमंत्रिपद आणि अन्य २६ मंत्रिपदं ही भाजपकडेच राहतील. भाजपच्या या ‘ऑफर’नंतर शिवसेना काय भूमिका घेते याकडे भाजपचे  लक्ष लागले आहे.

विधानसभा निवडणूक प्रचारादरम्यान आणि निकाल जाहीर झाल्यानंतर भाजप-शिवसेना यांच्यात सत्तासंघर्ष सुरू होता. लोकसभा निवडणुकांवेळी विधानसभेसाठी सत्तावाटपाचं सूत्र ठरल्याचं सांगत, मुख्यमंत्रिपद आणि समान वाटा मिळालाच पाहिजे, असा आग्रह शिवसेनेने  धरला आहे . तर सत्तास्थापनेच्या फिफ्टी-फिफ्टी फॉर्म्युल्यानुसार शिवसेनेला अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्रिपद देण्याचे ठरले नसल्याचे  विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्यानंतरशिवसेनेत  खळबळ उडाली होती . शिवसेनेच्या या भूमिकेमुळे सरकार स्थापन करण्याच्या प्रक्रियेला खीळ बसली आहे.

दरम्यान शिवसेना अजूनही आपल्या  फॉर्म्युल्यावर ठाम आहे. सत्ता स्थापण्याचे अनेक फॉर्म्युले समोर येत असतानाच, भाजपच्या बैठकीत विधीमंडळ पक्षनेते म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची निवड करण्यात आली आहे. राज्यात पुन्हा महायुतीचं सरकार स्थापन होणार आहे, असं त्यांनी आज ठामपणे सांगितलं . भाजपनं पक्षाच्या विधीमंडळ नेत्याची निवड करून एक पाऊल पुढं टाकलं असतानाच, त्यांनी शिवसेनेसमोर सत्तावाटपाचा नवा प्रस्ताव ठेवल्याचं कळतं. त्यानुसार, मुख्यमंत्रिपद आणि अन्य २६ मंत्रिपदे ही भाजपकडे राहणार आहेत. त्यात गृह, अर्थ, नगरविकास आणि महसूल ही महत्वाची खाती ही भाजपकडे राहणार असून  शिवसेनेला उपमुख्यमंत्रिपद आणि अन्य १३ खाती देण्याची तयारी भाजपनं दाखवली आहे, असे वृत्त आहे.

दरम्यान विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून आठवडा उलटला तरी सत्तास्थापनेचा तिढा अद्याप सुटला नाही. १०५ जागा जिंकून भाजप हा पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरला असून  अन्य पाच आमदारांनी भाजपला पाठिंबा दिला आहे. त्यामुळं त्यांचं संख्याबळ ११० पर्यंत पोहोचलं आहे, तर शिवसेनेला ५६ जागांवर विजय मिळाला असून, त्यांनाही अन्य पाच आमदारांनी पाठिंबा दिला आहे. त्यामुळं त्यांचं संख्याबळ ६१ वर पोहोचलं आहे. मात्र, कोणत्याही एका पक्षाला स्वबळावर सत्ता स्थापण्यासाठी बळ मिळू शकलं नाही. त्यामुळं भाजप आणि शिवसेनेला एकत्र आल्याशिवाय पर्याय नाही, असं सांगितलं जात आहे.

राज्यातील निकालामुळे आपल्याशिवाय कुणाचेच सरकार बानू शकणार नसल्याने दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या शिवसेनेचा आत्मविश्वास वाढला असून, उद्धव ठाकरे यांनी भाजपला ठरलेल्या फॉर्म्युलाची आठवण करून दिली आहे. मुख्यमंत्रिपद आणि सत्तेत समान वाटा या दोन मुद्द्यांवर शिवसेना आग्रही आहे. तर कोणत्याही परिस्थितीत भाजपच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन करणार असा निर्धार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलून दाखवला होता. त्यामुळं सत्ता स्थापनेचा तिढा आणखीनच वाढला आहे.

आता हा तिढा सोडवण्यासाठी भाजपनं शिवसेनेसमोर नवा प्रस्ताव ठेवला आहे. भाजपच्या या प्रस्तावावर शिवसेनेकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. त्यामुळं शिवसेना नक्की कोणती भूमिका घेणार याकडे सर्वांचे  लक्ष लागले आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!