आईचा प्रियकर असल्याच्या संशयावरून तरुणाची हत्या

मुंबईतील वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स पोलीस ठाण्याच्या हद्दीत आईचा प्रियकर असल्याच्या संशयावरून तरुणाची डोक्यात पेव्हर ब्लॉक घालून हत्या केल्याची घटना घडली. या प्रकरणी पोलिसांनी तरुणाला अटक केली असून शाहबाज शेख असं या तरुणाचं नाव आहे. तो महाविद्यालयीन तरूण आहे. त्याच्या आईचे आणि तरुणाचे प्रेमसंबंध असल्याचा संशय या मुलाला होता. यातूनच त्यानं त्याची हत्या केल्याची माहिती समोर आली आहे.
परवेझ शेख असं हत्या झालेल्या ३७ वर्षीय तरुणाचे नाव आहे. तो रिअल इस्टेट एजंट आहे. ५५ वर्षीय आईसोबत परवेझसोबत प्रेमसंबंध असल्याचा संशय शाहबाजला होता. यातूनच त्यानं त्याची हत्या केली अशी माहिती वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स पोलिसांनी दिली.
या बाबत पोलिसांनी सांगितले कि , आरोपी शाहबाजला त्याची आई आणि परवेझ शेख सोमवारी रात्री साडेदहाच्या सुमारास एका निर्जन स्थळी दिसल्याने तो चिडला होता. त्याने तिथेच त्यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. या वादाचं पर्यावसन भांडणात झालं. आणि शाहबाजने परवेझच्या डोक्यात रस्त्यावरील पेव्हर ब्लॉक घालून त्याची हत्या केली. या घटनेनंतर अवघ्या एका तासातच शाहबाजला पोलिसांनी अटक केली. शाहबाजनं परवेझच्या हत्येची कबुली दिली आहे, असेही पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले .
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार परवेझ आणि संबंधित महिलेची पाच वर्षांपूर्वी भेट झाली होती. त्यावेळी ही महिला कपडे विक्रीचा व्यवसाय करत होती. त्यानंतर परवेझच्या रिअल इस्टेट व्यवसायात ती भागीदार झाली. परवेझ नेहमी या महिलेच्या घरी जायचा. या दोघांचे प्रेमसंबंध असल्याचा संशय शाहबाजला होता, अशी माहिती समोर आली आहे. सोमवारी रात्री साडेदहाच्या सुमारास परवेझ आणि ती एका निर्जन स्थळी शाहबाजला दिसले. शाहबाजनं त्यांना पाहिल्यानंतर तो प्रचंड चिडला. त्यानं परवेझशी वाद घातला. त्यातून भांडण झाले. त्यानं परवेझला खाली पाडले आणि डोक्यात पेव्हर ब्लॉक घालून हत्या केली. हत्येच्या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. वेगानं तपासाची चक्रे फिरवून शाहबाजला एका तासातच अटक केली. शाहबाजनं केलेल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे.