महाराष्ट्र विधानसभा : शिवसेनेला १०० हुन अधिक जागा मिळतील , संजय राऊत यांना विश्वास

‘विधानसभेच्या नव्या सभागृहात शिवसेनेचे १०० हून अधिक आमदार निवडून जातील,’ असा विश्वास व्यक्त करतानाच, ‘शिवसेनेशिवाय भाजप महाराष्ट्रात राज्य करू शकत नाही,’ असा दावा शिवसेनेचे नेते, खासदार संजय राऊत यांनी आज व्यक्त केला. ‘शिवसेनेला १२४ जागाही मिळू शकतात. पण शेवटी आम्ही युतीमध्ये लढलो आहे. भाजप व शिवसेना या दोन्ही पक्षांना एकमेकांशिवाय पर्याय नाही,’ असंही ते म्हणाले.
राज्य विधानसभा निवडणुकीचा निकाल उद्या लागणार आहे. त्या पार्श्वभूमीवर एका वृत्तवाहिनीशी बोलताना राऊत यांनी शिवसेनेच्या मोठ्या विजयाचा विश्वास व्यक्त केला. ‘प्रत्येक पक्ष हा जास्तीत जास्त जागा जिंकण्यासाठीच लढतो. शिवसेना या निवडणुकीत १०० च्या वर जागा जिंकेल,’ असं राऊत म्हणाले.
भाजपला बहुमत मिळाल्यास काय ? असे विचारले असता “युतीला बहुमत मिळेल” असे उत्तर राऊत यांनी दिलं. भाजपला चांगल्या जागा मिळतील. २०१४ च्या निवडणुकीत त्यांना शंभरहून अधिक जागा मिळाल्या होत्या. त्यापेक्षा जास्त मिळाव्या असा त्यांचा प्रयत्न असणं साहजिक आहे. शेवटी सत्ताधाऱ्यांकडं जी काही साधनं असतात त्याचा फायदा मिळतोच, असं सूचक वक्तव्यही त्यांनी केलं.
महाराष्ट्रात शिवसेनेचा मुख्यमंत्री होणारच, याचा पुनरुच्चारही संजय राऊत यांनी केला. ‘महाराष्ट्राच्या विधानभवनात शिवसेनेचा मुख्यमंत्री बसणार, असा शब्द उद्धव यांनी दिलाय. त्यांच्या नेतृत्वावर आणि डावपेचांवर आम्हा सर्व शिवसैनिकांचा विश्वास आहे. त्यांचा शब्द पूर्ण करण्यासाठी आम्ही सगळे प्रयत्न करणार,’ असं त्यांनी सांगितलं.