Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

महाराष्ट्र विधानसभा : निवडणूक निकालाची तयारी पूर्ण , २५ हजाराहून अधिक कर्मचाऱ्यांची नियुक्ती , राज्यभर कडेकोट बंदोबस्त

Spread the love

राज्यात २८८  विधानसभा मतदारसंघांच्या सार्वत्रिक आणि सातारा लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीच्या उद्या होणाऱ्या मतमोजणीची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. यासाठी  पंचवीस हजारांहून अधिक अधिकारी-कर्मचाऱ्यांची मतमोजणीसाठी नेमणूक करण्यात आली असल्याची माहिती अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी आज दिली. मतमोजणी दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून प्रत्येक मतमोजणी केंद्रावर मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.


निवडणूक आयोगाने २८८ जागांच्या मतमोजणीसाठी जय्यत तयारी केली आहे. उद्या सकाळी ८ वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे. राज्यातील २६९ ठिकाणी २८८ केंद्रांवर ही मतमोजनी होणार आहे. प्रत्येक मतदारसंघात केंद्राच्या संख्येवर मतमोजणीसाठी १४ ते २० टेबल ठेवण्यात येणार आहेत. यावेळी उमेदवारांच्या प्रतिनिधींना प्रत्येक टेबलवरील मतमोजणी दरम्यान उपस्थित राहण्याची मुभा देण्यात आली आहे. यावेळी केंद्रीय निवडणूक आयोगाचे निरीक्षकही उपस्थित राहणार आहेत. उमेदवारांनी फेरमतमोजणीची मागणी केल्यास फेरमतमोजणी करण्याचा निर्णय निवडणूक अधिकारी घेणार असल्याचं राज्याचे अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी सांगितलं.

मतमोजणी केंद्राबाहेर उमेदवारांचे समर्थक मोठ्या प्रमाणावर उपस्थित असतात. निकालानंतर मतमोजणी केंद्रावरूनच विजयी उमेदवारांच्या मिरवणुका काढण्यात येतात. त्यामुळे या दरम्यान दोन गटात हाणामारी, वादावादी होण्याची शक्यता असते. यापार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून प्रत्येक मतमोजणी केंद्राबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तसेच स्ट्राँग रुममध्येही केंद्रीय सशस्त्र पोलीस दल, राज्य राखीव पोलीस दल आणि स्थानिक पोलिसांचा बंदोबस्त राहणार आहे.

दरम्यान, राज्यातील जनतेला प्रत्येक मतदारसंघाचा निकाल तात्काळ पाहता यावा यासाठी निवडणूक आयोगाने अँड्राइड अॅप विकसीत केले आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या result.eci.gov.in या संकेतस्थळावर नागरिकांना निकाल पाहता येणार आहेत. तसेच voter helpline हे अॅप गुगल प्लेस्टोअरमधून डाऊनलोड करूनही निवडणुकीचे ताजे अपडेट घेता येणार आहेत. यात मतदारसंघाचे फेरनिहाय निकाल, उमेदवारांची पक्षनिहाय आघाडी, विजयी-पराभूत उमेदवार आणि पक्षनिहाय मतांची टक्केवारी आदी माहितीही या अॅप आणि संकेतस्थळावर उपलब्ध होणार आहे. तसेच मंत्रालयासमोरील माहिती जनसंपर्क महासंचालनालयाच्या एलईडी स्क्रीनवरही निकाल प्रदर्शित करण्यात येणार आहेत.

प्रत्येक मतदान केंद्रात एका टेबलसाठी एक पर्यवेक्षक, दोन सहाय्यक आणि एक सुक्ष्म निरीक्षक तैनात असणार आहेत. मतदारसंघातील ५ बुथच्या व्हीव्हीपॅटमधील चिठ्ठ्यांची मोजणी केली जाते. उमेदवार किंवा त्यांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत चिठ्ठी टाकून हे पाच बुथ निवडले जातात. त्यानंतर या व्हीव्हीपॅटमधील मते आणि ईव्हीएममधील मतांची पडताळणी केली जाईल. दरम्यान स्ट्राँग रुम आणि मतमोजणी केंद्रात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले असून स्ट्राँग रुममधून मतपेट्या बाहेर काढण्यापासून ते त्या मतमोजणी केंद्रावर नेण्यापर्यंतचे चित्रीकरण करण्यात येणार आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!