महाराष्ट्राच्या किनाऱ्यावर मोठे वादळ धडकण्याची शक्यता, शेतकऱ्यांना मदतीचा केंद्र सरकारचा निर्णय

Union Minister Prakash Javadekar: Cabinet has decided to increase the Minimum Support Price (MSP) for Rabi crops, MSP for wheat and barley has been increased by Rs 85 , gram by Rs 255, Masur (Lentil) by Rs 325, mustard by Rs 225. pic.twitter.com/ZqulWe9p50
— ANI (@ANI) October 23, 2019
केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. रब्बी पिकांच्या हमीभावात ८५ रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे दिवाळीअगोदरच केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांना मोठे गिफ्ट मिळाल्याचे बोलले जात आहे. आज केंद्रीय मंत्रीमंडळाची दिल्लीत कॅबिनेटची बैठक पार पडली. या बैठकीत रब्बी पिकांचा हमीभाव वाढवण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी पत्रकार परिषद घेऊन यासंदर्भात माहिती दिली. दरम्यान, हमीभावा संदर्भात घेतल्या गेलेल्या या निर्णयामुळे केंद्र सरकारवर ३ हजार कोटींचा बोजा पडणार आहे.
राज्यात पाऊस परतीच्या वाटेवर असताना सध्या महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यात जोरदार पाऊस चालू असून याबाबतची आणखी एक बातमी म्हणजे एक वादळ महाराष्ट्राच्या किनाऱ्यावर धडकण्याची शक्यता आहे. निकालाच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे २५ आणि २६ ऑक्टोबरला महाराष्ट्रात चक्रीवादळाची शक्यता आहे असा इशारा हवामान विभागानं दिलाय. या चक्रीवादळामुळे मुंबई ठाणे आणि परिसरात मुसळधार पाऊस पडेल असा इशाराही देण्यात आलाय. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे पाऊस आणि चक्रीवादळाची शक्यता व्यक्त केली जातेय.
या काळात मच्छिमारांनी समुद्रात जावू नये असा सल्लाही हवामान विभागाने दिलाय. हा कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे मुंबई, ठाणे आणि परिसरात जोरदार पाऊस होऊ शकतो. मान्सून महाराष्ट्रातून परतल्यानंतरही पाऊस अजुनही राज्यात रेंगाळलेलाच आहे. पुणे आणि राज्यातल्या काही भागात पाऊस बरसत असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
पुण्यासह राज्यात पुढील ४८ तासांत मुसळधार पाऊसाची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तवली आहे. बुधवारी रात्रीही पावसाची शक्यता आहे. विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस होण्याची शक्यता आहे. कोकण, मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्याच्या काही भागातही जोरदार वादळी पाऊस होऊ शकतो. राज्यात २७ ऑक्टोबरपर्यत पाऊस राहणार असून बंगाल आणि अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने पाऊस स्थिती निर्माण झाल्याचे पुणे वेधशाळेचे अधिकारी अनुपम कश्यप यांनी सांगितले आहे. तसेच मुंबई वेधशाळेने राज्यातील आठ जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. शनिवारपर्यंत राज्यभरात पावसाचं प्रमाण कमी-अधिक असेल. त्यामुळे गुलाबी थंडीत येणारी दिवाळी यावेळी ऐन पावसात साजरी करावी लागणार, अशी चिन्हे आहेत.
पुणे, नगर, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, बीड आणि उस्मानाबाद या जिल्ह्यांत मंगळवार आणि बुधवार मुसळधार पाऊस पडू शकतो, त्यामुळे सतर्क राहा, असा इशारा देण्यात आला आहे. काही भागात वादळी वाऱ्यांसह, ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पावसाची शक्यता आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात शनिवारपर्यंत सतर्कतेचा इशारा म्हणजे ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
महाराष्ट्रातल्या कोकण, मध्य महाराष्ट्रासह, विदर्भ आणि मराठवाड्यात लांबलेल्या पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतात काढून ठेवलेला मका, बाजरी, ज्वारी, कपाशी पीक पूर्णपणे नष्ट झाले. या पावसाचा द्राक्ष बागांना देखील मोठा फटका बसलाला मुसळधार पावसाने रायगड जिल्ह्यात कापणी केलेले भातपीक पुरते वाया गेले आहे.