महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९ : कोण काय म्हणाले ? राष्ट्रीय मुद्यांचा परिणाम झाला कि नाही ते तीन दिवसांनी कळेल : मोहन भागवत

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी मतदानाला ७ वाजता सुरुवात होताच नागपूरमध्ये मतदानाचा हक्क बजावला. मतदान केल्यानंतर त्यांनी स्वातंत्र्यवीर सावकर यांना भारतरत्न देण्याच्या मागणीवरून काँग्रेसने आरएसएसवर केलेल्या टीकेवर उत्तर दिले. आम्हाला गेल्या ९० वर्षांपासून लक्ष्य केले जात असून, याची आता आम्हाला सवय झालीय. यात चिंता करण्यासारखे काहीही नाही. हे राजकारण आहे आणि यात सर्वकाही चालते, अशी प्रतिक्रिया भागवतांनी व्यक्त केली.
यंदाच्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय मुद्दे प्रभावी वाटत आहेत, मात्र या सर्व राष्ट्रीय मुद्द्यांचा या विधानसभा निवडणुकीवर किती परिणाम होईल, असा प्रश्न प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी भागवत यांना विचारला. त्या प्रश्नाचे उत्तर देताना ते म्हणाले की, ‘याचा अंदाज बांधणे कठीण आहे. मी राजकीय व्यक्ती नाही आणि मतदान झाल्यानंतर ३ दिवसांनी सर्व प्रश्नांची उत्तरे मिळणार आहेत.’
भारतीय समाज हा एक असून तो कायम एकच राहणार आहे हे सर्वांनी लक्षात ठेवणे आवश्यक असल्याचेही ते म्हणाले. ज्यातील मतदारांनी मोठ्या संख्येने घराबाहेर पडावे आणि आपला मतदानाचा हक्क बजावावा, असेही आवाहनही यावेळी भागवत यांनी केले. आपले प्रतिनिधी निवडणे ही नागरिकांची जबाबदारी आहे. आम्ही तर १०० टक्के मतदानावर भर देत आहोत. मुद्द्यांवर मतदान करा, व्यक्ती किंवा वातावरणानुसार मतदान करू नका, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.