Aurangabad : बोगस मतदानावरून एमआयएम -राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी , पोलीस वेळेत आल्याने परिस्थिती नियंत्रणात

मंजूरपुरा लोटाकारंजा येथील मतदान केंद्रावर बोगस मतदान होत असल्याच्या कारणावरून एमआयएम आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आपआपसात भिडले. दोन्ही गटात जुंपल्याने या मतदान केंद्रावर पोलिसांचा फौजफाटा वाढवण्यात आला असून सध्या या केंद्रावरची परिस्थिती नियंत्रणात असल्याचं सांगण्यात येतं.
मंजूरपुरा लोटाकारंजा येथे बोगस मतदान होत असल्याच्या आरोपावरून राष्ट्रवादीच्या उमेदवाराच्या मुलाने एमआयएमच्या पोलिंग बूथचा टेबल फेकला. यावेळी दोन्ही गटात शिवीगाळ होऊन त्याचं पर्यावसान हाणामारीत झालं. त्यामुळे या भागात तणावसदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याने तातडीने पोलीस आणि राज्य राखीव दलाच्या कर्मचाऱ्यांना पाचारण करण्यात आलं. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन दोन्ही गटाला पांगवून परिस्थिती नियंत्रणात आणली आहे. राष्ट्रवादी आणि एमआयएमचे कार्यकर्ते आमनेसामने येऊ नये म्हणून पोलिसांनी या परिसरात गस्त घालायला सुरुवात केली आहे. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच खासदार इम्तियाज जलील यांनी मतदान केंद्रावर जाऊन पाहणी केली.
तर विज्ञान वर्धिनी शाळा क्रमांक १३५ येथील मतदान केंद्रावर ईव्हीएम मशीन अचानक बंद पडली. तब्बल दीड तास मशीन बंद पडल्याने मतदान करण्यासाठी आलेल्या मतदारांना रांगेत तिष्ठत उभे रहावे लागले. त्यामुळे या मतदारांची प्रचंड गैरसोय झाली.