Aurangabad : मतदारच निघाले उमेदवारांच्या शोधात…. कार्यालय परिसरात गर्दीच गर्दी , पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांचे कडक कारवाईचे आदेश

औरंगाबाद – उद्या होत असलेल्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर ज्या मतदारांना उमेदवारांच्या दर्शनाची आस लागली आहे असे मतदार आणि कार्यकर्ते शहरातील उमेदवारांच्या कार्यालयात गर्दीच गर्दी करीत असून कार्यालयातून उमेदवार मात्र गुप्त ठिकाणे शोधून आपल्या विजयाची सेटिंग लावत आहेत. दरम्यान शहरात जमावबंदीचे आदेश लागूअसतांना बर्याच भावी आमदारांच्या कार्यालय परिसरात होणारी मतदारांची गर्दी पांगविण्यासाठी पोलिसांना बरेच प्रयत्न करावे लागत आहेत असे चित्र दिसत आहे .
या प्रकरणी आपण कडक कारवाई करण्याचे आदेश दिले असल्याची माहिती शहराचे पोलिसआयुक्त चिरंजीवप्रसाद यांनी दिली आहे.
आमच्या प्रतिनिधीने शहरात फेरफटका मारला असताना दिसून आले कि , अनेक भावी आमदारांच्या कार्यालयावर महत्वाच्या विषयावर गुफतगू करण्यासाठी थेट मतदारांचेच जत्थे जमा होत आहेत. हे जमाव पाहून उमेदवार मात्र आपल्या नियोजनाप्रमाणे गुप बैठक घेण्यात व्यस्त आहेत .
दरम्यान मतदान काही तासावर येऊन ठेपले असतांना काही भावी आमदार आणि त्यांचे प्रमुख कार्यकर्ते या जमावशी अर्थपूर्ण चर्चा करीत असल्याची माहिती शहराचे पोलिस उपायुक्त निकेश खाटमोडे यांना मिळाल्यानंतर त्यांनी पोलिसआयुक्त चिरंजीवप्रसाद यांच्या आदेशावरुन सर्वच उमेदवारांच्या कार्यालयाकडे विशेष पथके रवाना केली आहेत.
शहरातील जिन्सी, सिडको, हडको, पदमपुरा या भागात जमावबंदीचे आदेश धाब्यावर बसवून हि गर्दी होत आहे . बऱ्याचदा कार्यकर्ते स्वतः या जमावाला तुम्ही जा , आमदारसाहेब तुमच्या भेटीला येतील असे सांगून गर्दीला कटविण्याचा प्रयत्न करीत आहेत परंतु थेट उमेदवाराला भेटल्याशिवाय जाणार नाही असा आग्रह हे मतदार आणि वार्डा वार्डातील मतदार आणि कार्यकर्ते धरताना दिसत आहेत. त्यामुळे पोलिसांना रात्रभर या गर्दीवर लक्ष ठेवण्यातही प्रयत्न करावे लागणार आहेत .
दरम्यान औरंगाबादेत पूर्व, पश्र्चिम आणि मध्य या ठिकाणी बर्याच मतदारांना अद्यापही शासनाच्या, उमेदवारांच्या पोलिंग चिट मिळालेल्या नाहीत, या पोलचिट वाटण्याचे काम आम्ही करीत आहोत असे कार्यालयातील कार्यकर्त्यांकडून सांगितले जात आहे. बातमी प्रसिद्ध होईपर्यंत अद्याप कुठेही आचारसंहितेचा कुठलाही गुन्हा दाखल झालेला नव्हता.