शरद पवारांच्या ” पाऊस सभे”वर उद्धव ठाकरेंची टीका तर आदित्य ठाकरेंकडून कौतुक

राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या “पाऊस सभे”वर शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी टीका केली असली तरी आदित्य ठाकरे यांनी मात्र पवार आजोबांचे कौतुक करून त्यांच्याकडून खूप काही शिकण्यासारखे असल्याचे उद्गार काढले आहेत. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी शनिवारी शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी मुंबईतील धारावीमध्ये रोड शो केला. पावसाच्या सरी सुरू असतानाच, आदित्य ठाकरे यांचा रोड शो झाला.
‘राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडून शिकण्यासारखे खूप काही आहे. ते माझ्या आजोबांचे मित्र होते. शरद पवार यांनी साताऱ्यात भर पावसात घेतलेली सभा खरेच सर्वांनी कौतुक करण्यासारखी आहे,’ असे ते यावेळी म्हणाले.
पावसाच्या सरी सुरू असतानाच मुंबईतील धारावीमध्ये आदित्य ठाकरे यांचा रोड शो झाला. यावेळी त्यांनी शरद पवार यांच्या साताऱ्यातील पावसात केलेल्या भाषणाचे कौतुक केले. आदित्य ठाकरे यांच्या या रोड शोमध्ये सलमान खानचा बॉडीगार्ड शेराही सहभागी झाला होता. चित्रपट अभिनेता सलमान खानचा अनेक वर्षांचा विश्वासू बॉडीगार्ड शेरा याने शिवसेनेत प्रवेश केला आहे. इतकी वर्षे शेरा हा सलमान खानसोबत सावलीसारखा राहिला आहे. जिथे सलमान तिथे शेरा हे समीकरणच बनले आहे.
हातात शिवबंधन बांधल्यानंतर लगेचच शेरा याने आदित्य ठाकरे यांच्यासोबत धारावीच्या प्रचारफेरीत सहभागही घेतला. ‘अब शेरों के साथ शेरा भी आया है’ अशा शब्दांत आदित्य ठाकरेंनी त्याचे कौतुक केले. तर मी या मुंबईतच जन्मलो. माझी कर्मभूमी महाराष्ट्रच आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्रासाठी खूप काही केले आहे. त्यामुळे मी शिवसेनेत प्रवेश केल्याची प्रतिक्रिया शेरा यांनी दिली.