धो डाला ….शरद पवार आणि रोहित पवार यांच्या ‘पाऊससभां’मुळे महायुतीच्या प्रचारावर फिरले पाणी !! सोशल मीडियावर पवार झाले पॉवरफुल्ल !!

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांचा प्रचंड उत्साही आणि आशावादी प्रचार सध्या चर्चेचा विषय झालाच आहे पण त्यात त्यांच्या साताऱ्यातील भर पावसातील सभेमुळे ते चांगलेच झोतात आले असून त्याचा परिणाम राष्ट्रवादीच्या मतदानावर अनुकूलच पडेल असे चित्र आहे. त्यांनी केलेल्या या साताऱ्यातील भाषणाची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात चांगलीच रंगली आहे. आधी ईडी मग झंझावाती प्रचार आणि आता भर पावसातील सभा या त्यांच्या जमेच्या बाजू ठरल्या आहेत. काहीही करून हे सरकार उलथून टाकायचे अशी खूणगाठ पवारांनी बांधली असून त्याचा चांगलाच परिणाम पाहायला मिळत आहे.
साताऱ्याची राष्ट्रवादीकडे असलेली असलेली लोकसभेची जागा उदयन राजे गेले तरी आपल्याकडे कायम राहावी यासाठी पवारांनी प्रतिष्ठेची केली आहे. आपल्या गाजलेल्या सभेत बोलताना ते म्हणले कि , आपल्या हातून काही चूक झाली तर ती मान्य करायची असते, लोकसभेच्या वेळी मी चूक केली हे मान्य करतो. मला आनंद हा आहे की ही चूक दुरुस्त करण्यासाठी सातारकर २१ तारखेची वाट बघत आहेत. श्रीनिवास पाटील यांना मोठ्या मतांनी विजयी करतील हा मला विश्वास वाटतो असंही पवार म्हणाले. तुम्ही आता श्रीनिवास पाटील यांना निवडून द्या असंही आवाहन शरद पवार यांनी केलं. इतकंच नाही तर आपल्या स्वागतासाठी पाऊस पडू लागला आहे. २१ तारखेला परिवर्तन नक्की घडेल असा विश्वासही शरद पवार यांनी व्यक्त केला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्वागतासाठी साक्षात वरुणराजानेही आपल्याला आशीर्वाद दिले आहेत. त्यांच्या आशीर्वादामुळे सातारा जिल्हा चमत्कार घडवेल असा विश्वास मला वाटतो असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे.
विशेष म्हणजे या पावसातून सभेसाठी आलेला एकही माणूस सभेतून हलला नाही. किंवा पावसापासून बचावाचा प्रयत्न केला नाही मतदारांचीही इतकी कमिटमेंट पहिल्यांदाच महाराष्ट्राला पाहावयास मिळाली.
पवार पुढे म्हणाले कि , देशाचे पंतप्रधान या ठिकाणी आले होते, एका बाजूला राज्याचे मुख्यमंत्री म्हणतात आमचे पैलवान आखाड्यात उतरले आहेत. मात्र समोर कोणी दिसतच नाही, भाजपावाल्यांच्या तोंडी कुस्ती, पैलवान हे शब्द शोभतच नाहीत असं शरद पवार यांनी म्हटलं आहे. राष्ट्रवादीचे पैलवानच निवडून येतील असा विश्वासही त्यांंनी व्यक्त केला.
रोहित पवार यांचीही भर पावसात सभा….
दरम्यान सातारा येथील सभेत शरद पवार यांच्या पाऊस सभेच्या बातमी बरोबरच त्यांचे नातू रोहित पवार यांचीही अशीच बातमी समोर आली आहे. रोहित पवार हे बोलत असताना पाऊस सुरु झाला. भर पावसात त्यांनीही भाषण सुरु ठेवलं. रोहित पवार यांच्या या भाषणाचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. सगळ्यांनी एकत्र या, मतदान करा. आपल्या विचारांचा उमेदवार निवडून कसा येईल हे सांगण्यासाठी तुम्ही प्रयत्न कराल अशी मला खात्री आहे असं रोहित पवार त्यांच्या भाषणात म्हणाले.
शरद पवार यांनी पावसात भाषण केल्याने त्यांनी भाजपा आणि शिवसेना नेत्यांचा प्रचार धुऊन टाकला अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. रात्रीपासूनच या भाषणाचे व्हिडीओ, फोटो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत. हे होत असतानाच आता रोहित पवार यांचाही पावसात भिजतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आहे. रोहित पवार यांनीही आजोबा शरद पवार यांच्याकडून राजकारणाचे धडे घेतले आहेत. पाऊस आला तरीही न थांबता ते भाषण करत राहिले आणि विरोधकांवर बरसले तसेच त्यांनी जास्तीत जास्त प्रमाणात मतदान करा असेही आवाहन केले.