Aurangabad Crime : कराराचा भंग करणा-या केबल ऑपरेटरविरूध्द गुन्हा दाखल

औरंंंगाबाद : हॅथवे एमसीएनचे केबल ऑपरेटर असतांना देखील कराराचा भंग करून ७ लाख ३४ हजार ४०० रूपये किमतीचे ६१२ सेटटॉप बॉक्स परत न करणा-या दोन केबल ऑपरेटर विरूध्द सिटीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नासेर खान मोहमंद हुसैन, वाजेद खान वाजीद मोहमंद हुसैन, दोघे राहणार हर्षनगर, लेबर कॉलनी अशी केबल ऑपरेटरची नावे आहेत. नासेर खान व वाजेद खान यांनी हॅथवे एमसीएनचे केबल ऑपरेटर म्हणून काम करीत असतांना हॅथवेकडून ७ लाख ३४ हजार ४०० रूपये किमतीचे ६१२ सेट टॉप बॉक्स ग्राहकांसाठी घेतले होते. परंतु दोघांनी २५ सप्टेंबर ते १४ ऑक्टोबर २०१९ या काळात हॅथवे एमसीएन सोबतच्या काराराचा भंग केला. तसेच दोघांनी हॅथवे एमसीएनकडून मिळालेले सेट टॉप बॉक्स परत न देता फसवणूक केली.
याप्रकरणी हॅथवे एमसीएनचे व्यवस्थापक चंद्रकांत शंकरराव देशमुख (वय ४५) यांनी दिलेल्या तक्रारीवरून कराराचा भंग करून सेट टॉप बॉक्स परत न देणा-या केबल ऑपरेटर विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक खटाने करीत आहेत.