पवारांनी सातारा न लढविण्याचे मोदींनी दिले हे कारण…

साताऱ्यात काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये भेद असल्याचे सांगत हे विकास काय करणार? अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टीका केली. साताऱ्यात लोकसभा पोटनिवडणुकीतील भाजपाचे उमेदवार उदयनराजे भोसले आणि विधानसभेचे महायुतीचे उमेदवार शिवेंद्रराजे भोसले यांच्यासाठी ही प्रचार सभा घेण्यात आली. साताऱ्यात प्राचारासाठी येणारे मोदी हे पाचवे पंतप्रधान आहेत.
नरेंद्र मोदी म्हणाले, काँग्रेसवाले साताऱ्याला आपला अभेद्य किल्ला मानत होते. मात्र, आता इथून त्यांना माघार घ्यावी लागली. ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडे असल्याचे ते सांगतात. मात्र, इथून खुद्द शरद पवारांनीही उभे राहण्याचे टाळले कारण हवेची दिशा त्यांना चांगली समजते. ते राजकारणातील मोठे खेळाडू आहेत त्यामुळे त्यांनी निवडणूक लढवायला विरोध केला. तसेच साताऱ्यात काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये भेद आहे, ही बाब खुद्द पृथ्वीराज चव्हाण यांनीच एका मुलाखतीत सांगितल्याचे मोदी यावेळी म्हणाले. साताऱ्यात काँग्रेस-राष्ट्रवादीची ही स्थिती आहे, इथे ते एकमेकांना आपली लायकी दाखवत आहेत. त्यामुळे जिथं कार्यकर्त्यांमध्येच भेद असेल तर ते राज्याचा विकास काय करणार? असा सवाल त्यांनी केला.
साताऱ्याचा दौरा आपल्यासाठी तीर्थयात्रा असल्याचे मोदी यावेळी म्हणाले. यावेळी त्यांनी आपल्या भाषणात जिल्ह्यातील अपशिंगे गावाचा आवर्जुन उल्लेख केला. ते म्हणाले, इथल्या अपशिंगे मिलिटरी गावाने राष्ट्रसेवेसाठी स्वतःला वाहून घेतले आहे. संपूर्ण सातारा जिल्ह्याला राष्ट्रप्रेमाचा आणि त्यागाचा इतिहास आहे. त्यामुळेच जेव्हा राफेल सारख्या आधुनिक लढाऊ विमानांचा विरोधक अपप्रचार करतात, कलम ३७० हटवण्याला विरोध करतात, वीर सावरकरांना विरोध करतात तेव्हा साताऱ्याचा पारा चढलेला असतो. काँग्रेस-राष्ट्रवादी जनभावना कळतं नाही. यावेळी त्यांना जनता कडक शिक्षा देणार आहे.
यावेळी साताऱ्याच्या गादीचे कौतुक करताना मोदी म्हणाले, आजवर भाजपाकडे शिवाजी महाराजांचे केवळ संस्कार होते आता त्यांचे कुटुंबियही आमच्यासोबत आहेत. गेल्या पाच वर्षांत महायुतीच्या सरकारने केंद्रातही आणि राज्यातही शिवाजी महाराजांच्या संस्काराप्रमाणे काम केले. सातारा जिल्ह्याला देशातल्या पहिल्या १५ पर्यटनस्थळांमध्ये स्थान मिळवून देऊ, असेही ते यावेळी म्हणाले.