गरिबांच्या अब्रूचे धिंडवडे काढून धनिकांची भले करणारे , भाजपचे दहशतवादी सरकार उलथून टाकण्याचे शरद पवारांचे आवाहन

राज्यातील दरेक विधानसभेत प्रचारासाठी धडक मारल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी आज मुंबईवर धडक मारीत आपल्या उमेदवारांच्या प्रचारार्थ दणकेबाज सभा घेऊन भाजप- सेना युतीच्या कारभारावर जोरदार टीका केली. आपल्या कालच्या दौऱ्यात त्यांनी चेंबूर आणि विक्रोळी येथे सभा घेतल्या.
विक्रोळी मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार धनंजय पिसाळ यांच्या प्रचारासाठी आयोजित प्रचार सभेत बोलताना पवारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केले. मुख्यमंत्र्यांची बुद्धी डळमळायला लागली आहे. या डळमळणाऱ्या बुद्धीला आधार देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा आणि इतर नेत्यांना महाराष्ट्रात प्रचारासाठी निमंत्रित करण्यात आलं आहे. या नेत्यांना येथे प्रचाराला बोलावल्याने प्रतिष्ठा वाढल्याचे जर तुम्हाला वाटत असेल तर वस्तुस्थितीपासून तुम्ही खूप दूर आहात, असा टोला पवारांनी फडणवीसांना लगावला.
अणुशक्तीनगर विधानसभा मतदारसंघातील उमेदवार नवाब मलिक यांच्या प्रचारासाठीही पवारांची चेंबूर येथे सभा झाली. या सभेत आता सरकार बदलण्याची वेळ आली आहे, अशी साद पवारांनी घातली. गेल्या पाच वर्षांत तुम्हाला केवळ भाजपची दहशत पाहायला मिळाली. ही दहशत आता तुम्हाला झुगारावी लागेल. जे सरकार तुमच्या-माझ्या हितांची जपणूक करत नाही, त्यांच्या हाती सत्ता द्यायची नाही, हा निश्चय तुम्हाला करावा लागेल, असे आवाहन पवार यांनी केले.
मुंबई हे औद्योगिक शहर म्हणून ओळखले जायचे परंतु आज येथील कारखाने व कामगार उद्ध्वस्त होत आहेत. शहरातील ५० टक्क्यांपेक्षा जास्त कारखाने बंद पडले आहेत. या शहरात १०० पेक्षा जास्त टेक्स्टाइल मिल होत्या त्याही राहिलेल्या नाहीत. कष्टकरी कामगारांच्या हातून रोजगार निसटत असताना केंद्र आणि राज्य सरकार या कामगारांच्या हितासाठी कोणतेच पाऊल टाकताना दिसत नाही. गरिबांच्या अब्रूचे धिंडवडे काढायचे आणि धनिकांच्या मदतीसाठी धावून जायचे हेच या सरकारचे धोरण आहे, असा आरोप पवार यांनी केला. ही स्थिती बदलायची असेल तर राज्यात परिवर्तन होणे आवश्यक असून त्यासाठी समविचारी पक्षांनी एकजुटीने उभे राहण्याची गरज आहे, असे पवार म्हणाले.