आमदार हर्षवर्धन जाधव यांच्या घरावर शिवसैनिकांचा हल्ला, उद्धव ठाकरे यांच्या संदर्भातील वक्तव्याची प्रतिक्रिया

कन्नडचे अपक्ष आमदार हर्षवर्धन जाधव यांच्या उद्धव ठाकरे आणि शिवसेनेचे सिल्लोडचे उमेदवार अब्दुल सत्तार यांच्या विरोधात अभद्र टीप्पणी केल्याच्या संतापातून त्यांच्या घरावर बुधवारी मध्यरात्री अज्ञातांनी हल्ला झाला असल्याचे वृत्त आहे. यात जाधव यांच्या गाडीची व घरांच्या काचांची नासधूस झाली आहे. हल्ल्याच्या वेळी ‘जय भवानी, जय शिवाजी’ अशा घोषणा दिल्या जात होत्या. त्यामुळं शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी हा हल्ला केल्याची चर्चा आहे.
सांगण्यात येत आहे कि हर्षवधन जाधव यांच्या समर्थ नगर येथील घरावर हा हल्ला झाला. मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास काही तरुण तिथं आले आणि त्यांनी जाधव यांच्या घरावर दगडफेक केली. तसंच, त्यांच्या गाडीलाही लक्ष्य केलं.
या विषयी अधिक माहिती अशी कि , हर्षवर्धन जाधव यांनी स्वत:चा शिवस्वराज्य पक्ष स्थापन केला आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून त्यांनी काही दिवसांपूर्वी राजीनामाही दिला होता. मात्र, तो स्वीकारण्यात आलेला नाही. ते पुन्हा एकदा कन्नड मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात आहेत. निवडणुकीच्या प्रचारासाठी मंगळवारी चिंचोली लिंबाजी येथील सभेत बोलताना जाधव यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबद्दल अपशब्द वापरले होते. त्या भाषणाचा व्हिडिओ सोशल मीडियावरून व्हायरल झाला. त्यामुळं शिवसैनिकांमध्ये संतापाची लाट होती. जाधव यांना प्रत्युत्तर दिलं जाईल, असा इशारा शिवसैनिकांनी दिला होता. या प्रकरणी पोलीस तक्रारही करण्यात आली होती. जातीय भावना भडकावल्याचा गुन्हा जाधव यांच्यावर दाखल करण्याची मागणी तक्रारीत करण्यात आली होती. त्यानंतर रात्री हा प्रकार घडला.
या प्रकरणावर बोलताना जाधव यांच्या पत्नी संजना जाधव यांनी या प्रकाराचा तीव्र निषेध केला असून . ‘माझे पती जाहीर सभेत बोलले होते. त्यांना उत्तर द्यायचं असेल तर जाहीर सभेत द्या. समोरासमोर द्या,’ असं त्या म्हणाल्या. हर्षवर्धन जाधव हे भाजपचे खासदार व केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचे जावई आहेत. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत औरंगाबाद मतदारसंघातून त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढविली होती. त्याच्या उमेदवारीमुळं मतविभाजन होऊन शिवसेनेचे चंद्रकांत खैरे यांचा पराभव झाला. तर, एमआयएमचे इम्तियाज जलील निवडून आले होते.