महाराष्ट्र विधानसभा २०१९ : मोदी , शहांच्या कलम ३७०च्या तुणतुण्यावर शरद पवारांचे सभांमधून जोरदार प्रहार

आज दिवसभरातील सभेत महाराष्ट्र विधानसभा निवडणूक प्रचारात भाजप वाजवीत असलेल्या कलम ३७० रद्दच्या तुणतुण्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना चांगलेच फटकारले. काहीही झाले तरी, कलम ३७० आम्ही रद्द केले. शेतकरी आत्महत्या झाल्या कलम ३७०, कारखाने बंद पडले कलम ३७०, बेरोजगारी वाढली तरी कलम ३७० अशी उपरोधिक टीका यावेळी पवार यांनी केली.
कोपरगाव विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आशुतोष काळे यांच्या प्रचारासाठी सभा झाली. त्यात शरद पवार बोलत होते. यावेळी माजी आमदार अशोक काळे, आशुतोष काळे, चैताली काळे, जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, कार्याध्यक्ष संदीप वरपे यांच्यासह कार्यकर्यांची विशेषतः तरुणांची मोठी गर्दी उपस्थित होती.
काश्मीरचे कलम ३७० रद्द त्याला शरद पवार यांचा पाठिंबा आहे का, अशी विचारणा करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीयमंत्री अमित शहा यांचा शरद पवार यांनी खरपूस समाचार घेतला. पवार म्हणाले की, अहो मोदी साहेब, कलम ३७० रद्द करतांना पार्लमेंटमध्ये आम्ही लोकांनी कधीच विरोध केला नाही. उलट पाठिंबाच दिला. असे असताना शरद पवार यांचा पाठिंबाआहे की, नाही ते सांगावे, अशी विचारणा का केली जातेय, असे पवार यांनी सांगितले. महाराष्ट्र बँकेच्या प्रकरणी मी सभासद नाही, संचालक नाही आणि कर्जसुद्धा काढलेले नाही, तरी माझ्यावर गुन्हा दाखल केला जातो. सत्तेचा दुरुपयोग करून सुडाचे राजकारण सत्ताधारी करत आहेत. आज तुम्ही सत्तेत आहात. पण, उद्या निवडणुकीत वेगळा निकाल लागल्यास तुम्ही सत्तेबाहेर बसाल, याचे भान ठेवा, असे शरद पवार यांनी सुनावले. मात्र, आम्ही कधीही सुडाचे राजकारण करणार नाही असे पवार यांनी स्पष्ट केले.
राज्यातील सत्ताधारी भाजप सरकारवर जोरदार टीका करतांना शरद पवार म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज यांचे अरबी समुद्रात स्मारक बांधण्याची हमी देऊन, शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करू, अशी आश्वासने देऊन भाजप सत्तेत आली. पण पाच वर्षे झालीत पण छत्रपतींच्या स्मारकाची एक वीट सुद्धा रचली नाही आणि शेतकारी कर्जमाफी झाली नाही.
राज्यात १६ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. त्यांच्या कर्जबाजारीविषयी सरकारला चिंता नाही. पण या देशातील धनदाडग्यांनी थकविलेले ८० हजार कोटींची कर्ज सरकारने फेडले. कर्जबाजारी शेतकऱ्यांना मदत करण्यास सरकारकडे पैसे नाहीत, अशी टीका त्यांनी केली. मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफी जाहीर केली, पण ती करताना अनेक अटी घातल्यामुळे कोणालाच फायदा झाला नाही, असेही ते म्हणाले. विदर्भात मुख्यमंत्र्यांच्या सभेपूर्वी एका तरुण शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. तुम्ही काहीच केले नाही, म्हणून आत्महत्या करतो, असे चिठ्ठीत लिहून ठेवले, असे पवार यांनी वर्तमानपत्रात छापून आलेल्या एका बातमीचा पुरावा देत, भाजप कसा खोटारडा कारभार करतो असेच सूचित केले. यावेळी आशुतोष काळे यांनी कोपरगावच्या आमदार या निष्क्रिय असल्याचा आरोप केला. पाणी प्रश्न मार्गी लावण्यात त्या अपयशी ठरल्या.