Aurangabad Crime : गँगस्टर इम्रान मेंहदीला सोमवारपर्यंत पोलिस कोठडी

औरंंंगाबाद : परराज्यातील शार्प शुटरच्या टोळीच्या मदतीने पोलिसांवर हल्ला करण्याच्या उद्देशाने गुन्हेशाखेच्या पोलिस उपनिरीक्षकावर पिस्तूल रोखल्या प्रकरणी २०१८साली एम. सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झालाहोता. म्हणून या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी कुख्यात गँगस्टर इम्रान मेंहदीला न्यायालयाने सोमवारपर्यंत (दि.१४) पोलिस कोठडी सुनावली. पोलिसावर हल्ला केल्याप्रकरणी गुन्हेशाखेचे एपीआय अजबसिंग जारवाल यांनी शनिवारी गँगस्टर इम्रान मेंहदी याला पुण्यातील येरवडा कारागृहातून ताब्यात घेतले. इम्रान मेंहदी याला कडेकोट पोलिस बंदोबस्तात न्यायालयात हजर करण्यात आले.अशी माहिती गुन्हेशाखेचे सहाय्यक पोलिस आयुक्त डाॅ.नागनाथ कोडे यांनी दिली .
न्यायालयाने त्याला सोमवारपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. यावेळी न्यायालय परिसरात क्युआरटी पथक, कमांडो पथक, दंगा नियंत्रण पथकासह मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता.
काय आहे प्रकरण…
सलीम कुरेशीसह पाच जणांची हत्या करणा-या कुख्यात गुन्हेगार तथा सुपारी किलर इम्रान मेहंदीला पोलिस संरक्षणातून पळवून नेण्याचा कट त्याच्या दोन साथीदारांनी रचला. त्यासाठी खास मध्यप्रदेशातून सात शार्पशुटरही मागवण्यात आले. त्यांना गुन्हे शाखा पोलिसांनी सुरक्षेसाठी असलेल्या पोलिसांवर हल्ला चढविण्यापुर्वीच पकडले. त्यांच्याकडून एक पिस्टल, नऊ जीवंत काडतुसे, दोन कार आणि मोबाईल जप्त केल्याचे पोलिस अधिका-यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. यातील दहा आरोपींना न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते. यावेळी न्यायालयात आरोपींच्या वकिलांनी अनेक शंका उपस्थित केल्या. त्यामुळे मेहंदीला पळवून नेण्याचा कट रचल्याचे कोडं आता उलगडेनासे झाले होते. दरम्यान, या संशयित दहा जणांना न्यायालयाने १ सप्टेंबरपर्यंत २०१८ पर्यंत पोलिस कोठडी सुनावली होती
सुपारी किलर इम्रान मेहंदीला साथीदार हबीब खालेद हबीब मोहंमद उर्फ खालेद चाऊस आणि मोहंमद शोएब मोहंमद सादेक हे कट रचवून पोलिस संरक्षणातून पळवून नेणार आहेत. अशी माहिती मिळाल्यावरुन तत्कालीन गुन्हे शाखा एपीआय घन्नशाम सोनवणे आणि पीएसआय अमोल देशमुख यांच्या पथकाने नारेगाव चौकात दहा जणांना पकडल्याचे सांगितले होते. त्यांच्याकडून एक पिस्टल, काडतुसे, दोन कार आणि मोबाईल देखील यावेळी जप्त करण्यात आले. तसेच यातील एकाने गुन्हेशाखेच्या अधिकार्यावर पिस्टल रोखल्यावरुन एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, ही कारवाई केल्यानंतर गुन्हे शाखेने इम्रान मेहंदीसह त्याच्या सात साथीदारांना न्यायालयासमोर हजर केल्याचे आयुक्तालयातील अधिका-यांनी सांगितले होते. पोलिसांवर हल्ला केल्यानंतर मेहंदीच्या पळवून नेण्याचा कट आखण्यात आला होता. अशी माहितीही पत्रकार परिषदेत तत्कालीन उपायुक्त डॉ. दिपाली धाटे-घाडगे यांनी दिली होती. यावेळी उपायुक्त निकेश खाटमोडे, सहायक पोलिस आयुक्त डॉ. नागनाथ कोडे आणि गुन्हे शाखा निरीक्षक मधुकर सावंत यांची उपस्थिती होती. परंतू याच आरोपींच्या वकिलांनी गुन्हे शाखेच्या कारवाईवर शंका व्यक्त केली. आरोपींच्या वकिलांनी अनेक प्रश्न उपस्थित केले.
……..
कारवाईवरुन पडलेले प्रश्न…
सात शार्पशुटरकडून केवळ एकच पिस्टल कसे काय मिळू शकते. यापुर्वी देखील मेहंदीला अनेकदा न्यायालयासमोर हजर करण्यात आले आहे. मग त्याच्या संरक्षणासाठी असलेल्या पोलिसांवर यापुर्वी कधीही हल्ला चढविण्यात आला नाही. शिक्षा झालेला हबीब खालेद हा सकाळपासूनच मोहंमद शोएब याच्यासोबत न्यायालयात हजर होता. हबीबला शिक्षा सुनावल्यानंतर त्याला पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. यानंतर मोहंमद शोएबला गुन्हे शाखेने न्यायालयातून ताब्यात घेतले. मग तो नारेगावातील चौकात आला कसा ? शेख यासेर शेख कादर (२३, रा. कौसर पार्क, नारेगाव) याची मोबाईल शॉपी आहे. तो केवळ संशयित आरोपींच्या कारजवळ उभा होता. त्याला देखील यात गोवण्यात आल्याचे त्याचे वकिल व्ही. सी. सुरडकर यांनी सांगितले. हर्सुल कारागृहाजवळ तीन गोळ्या झाडत सराव केल्याचे गुन्हे शाखेचे म्हणणे आहे. हे कारागृह हर्सुल पोलिस ठाण्याच्या हद्दीत येते. हर्सुल पोलिसांना या घटनेची माहिती का समजू शकली नाही.
……..
मेहंदीच्या संरक्षणासाठी आल्याची चर्चा…
सय्यद फैजल सय्यद एजाज (१८, रा. किलेअर्क), मोहंमद नासेर मोहंमद फारूख (२४, रा. चंपाचौक, नॅशनल हॉटेलसमोर) मध्यप्रदेशचे नफीस खान मकसूद खान (४०, रा. गोगावा), नकीब खान रयाज मोहंमद (५५, रा. निमराणी,) फरीद खान मन्सूर खान (३५, रा. अकबरपूर फाटा), सरुफ खान शकूर खान (४५, रा. ग्राम महाराज खेडी), शब्बीर खान समद खान (३२, रा. रजानगर-धरमपुरी), फैजूल्ला गणी खान (३७, रा. खडकवाणी), शाकीर खान कुर्बान खान (४०, रा. बालखड, सर्वांना जि. खारगोन, मध्यप्रदेश) हे संशयित सध्या अटकेत आहेत. २९ जानेवारी २०१८ रोजी मेहंदी आणि कुरेशी गटात तुफान हाणामारी झाली होती. यावेळी गुन्हे शाखेचे तत्कालीन पोलिस निरीक्षक शिवाजी कांबळे यांनी परिस्थिती हाताळली होती. हल्लेखोरांचे सीसी टिव्ही फुटेज गोळा करुन त्यांना अटक करण्यात आली होती. या हल्ल्यानंतर पुन्हा मेहंदीवर हल्ला होऊ नये. म्हणून त्याच्या संरक्षणासाठी संशयित आरोपी आले होते. अशी माहिती सुत्रांनी दिली होती.