खळबळजनक : अनैतिक संबंधात अडथळा नको म्हणून पित्याने घोटला तरुण मुलाचा गळा, दिड वर्षानंतर उघडकीस आला गुन्हा, पित्याला ठोकल्या बेड्या

अनैतिक संबंध प्रेयसीला आपल्या तरुण मुलाने शिवीगाळ करताच पित्याने त्याचा गळा घोटून खून केल्याचा प्रकार तब्ब्ल दिड वर्षानंतर उघडकीस आला आहे. याच पित्याने दिड वर्षांपुर्वी मुलाने आत्महत्या केल्याचा बनाव केला होता. मात्र, पुंडलिकनगर पोलिसांना वैद्यकीय अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्यांनी अवघ्या पंधरा दिवसात याप्रकरणाचा छडा लावून महापालिकेत वरिष्ठ लिपीक म्हणून कार्यरत असलेल्या या पित्याला अटक केली आहे. अशोक सदाशिव जाधव (५६, रा. रेणुकानगर, गारखेडा परिसर) असे त्याचे नाव असून, न्यायालयाने त्याला १४ आॅक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
या प्रकरणात पोलिसांनी दिलेली माहिती अशी कि , महानगर पालिकेत स्टोअर किपर असलेल्या अशोक जाधव याचे घरासमोरील एका महिलेसोबत अनैतिक संबंध होते. त्याचा मुलगा राहुल अशोक जाधव (३०, रा. रेणुकानगर, गारखेडा परिसर) याला हि माहिती मिळाली त्यावरुन पिता-पुत्रामध्ये ब-याच दिवसांपासून वाद सुरू होता. त्यातच २४ एप्रिल २०१८ रोजी ‘त्या’ महिलेच्या मुलाचा वाढदिवस होता. त्या वाढदिवसाचा खर्च आपले वडील अशोक जाधव याने केल्याचे राहुलला समजले. त्यामुळे त्याने पित्याशी वाद घालत त्या महिलेला देखील शिवीगाळ केली. परिणामी अशोक जाधवचा राग अनावर झाला आणि त्याने मुलगा राहुलचा गळा घोटून खून केला मात्र त्याने आत्महत्या केल्याचा बनाव केला परंतु दिड वर्षानंतर खरा प्रकार उघडकीस आला आणि आरोपी पित्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या.
पोलिसांनी पुढे सांगितले कि , राहुलची पत्नी २२ एप्रिल २०१८ रोजी प्रसूतीसाठी माहेरी गेलेली होती. तर अशोक जाधवचे त्याच्या पत्नीशी पटत नसल्याने ती देखील घरी नव्हती. पिता-पुत्राचे भांडण संपल्यानंतर राहुल घराच्या वरच्या मजल्यावर झोपी गेला होता. तो गाढ झोपेत असतानाच अशोक जाधवने मध्यरात्री दिडच्या सुमारास त्याचा गळा आवळून खून केला. त्यानंतर छताच्या हुकाला बेडशीट बांधून राहुलने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा बनाव केला. पुढे त्यांचा मृतदेह पोलिसांना कोणतीही माहिती न देता थेट घाटीत नेण्यात आला. घटनेची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी घटनास्थळ पंचनामा केला. त्यावेळी राहुलच्या उत्तरीय तपासणीच्या प्राथमिक अहवालात गळा आवळल्याचे समोर आले होते. पण त्याबाबत आपली कोणतीही तक्रार नसल्याचे अशोक जाधवने सांगितल्यामुळे याप्रकरणी पोलिसांनी कोणताही गुन्हा दाखल न करता केवळ आकस्मिक मृत्यूची नोंद केली. राहुलचे शिक्षण बी. ए. पर्यंत झालेले होते. त्याच्या निधनानंतर दिड महिन्यांनी त्याच्या पत्नीने मुलीला जन्म दिला होता.
मोबाईल तिस-या दिवशी दिला….
पुंडलिकनगर पोलिसांनी त्यावेळी घटनास्थळ पंचनामा केला होता. तेव्हा काही संशयास्पद वस्तू राहुल यांच्या खोलीत आढळल्या होत्या. तसेच त्यांच्या खोलीचा दरवाजा घटनेवेळी उघडाच होता. त्यावरुन पोलिसांना देखील संशय होता. मात्र, तक्रार देण्यासाठी कोणीही पुढे येत नव्हते. तर पुरावा नसल्याने पोलिसांचे देखील हात बांधल्या गेले होते. याप्रकरणाचा तपास करत असलेले जमादार लक्ष्मण हिंगे यांनी राहुल यांच्या मोबाईलची त्यावेळी मागणी केली होती. तेव्हा अशोक जाधवने मोबाईलमधील सर्व क्रमांक डिलीट करुन घटनेनंतर तिस-या दिवशी पोलिसांना तो दिला होता. त्यामुळे पोलिसांना तांत्रिक दृष्ट्या देखील तपास करणे अशक्य झाले होते.
पंधरा दिवसांपूर्वी आला अहवाल…..
राहुल यांच्या उत्तरीय तपासणीनंतर व्हिसेरा राखून ठेवण्यात आला होता. प्रयोग शाळेकडून पंधरा दिवसांपूर्वी व्हिसेराचा अंतिम अहवाल पुंडलिकनगर पोलिसांना प्राप्त झाला. त्यात राहुलचा गळा आवळून खून करण्यात आल्याचे उघड झाले. त्यामुळे उपायुक्त डॉ. राहुल खाडे, सहायक पोलिस आयुक्त रविंद्र साळोखे आणि पुंडलिकनगरचे सहायक पोलिस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांनी आरोपीला पकडण्याच्या हालचाली सुरू केल्या. बुधवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास उपायुक्त खाडे, सहायक पोलिस आयुक्त साळोखे आणि सहायक पोलिस निरीक्षक सोनवणे यांनी घटनास्थळाची पाहणी केली. तसेच अशोक जाधवच्या पत्नी व मुलांकडे सकाळी चौकशी केली. तेव्हा त्यांच्या विभक्त पत्नीने अशोक जाधवनेच गळा आवळून खून केल्याचे सांगितले. त्यावरुन त्याला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. कसून चौकशी केल्यावर त्याने खुनाची कबुली दिली. दरम्यान, गुरुवारी अशोक जाधवच्या प्रेयसीला देखील पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते.