महाराष्ट्र विधानसभा २०१९ : ठरले , भाजपच्या प्रचारार्थ पंतप्रधान सहा दिवस महाराष्ट्रात , शहा यांच्या नंतर परळीतही लावली सभा

राज्यातील भाजपच्या उमदेवारांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींचाही महाराष्ट्र प्रचार दौऱ्याचे आता ठरले असून दि. १३ ते १८ ऑक्टोबर या काळात ते राज्यात विविध मतदारसंघात महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार करणार आहेत. दरम्यान, राजकीयदृष्ट्या भाजपासाठी प्रतिष्ठेच्या असलेल्या परळी विधानसभा मतदारसंघातही मोदींची सभा होणार आहे. यावरून परळी हा मतदारसंघ आणि खास करून पंकजा मुंडे यांची लढत भाजपसाठी प्रतिष्ठेची मानली जात आहे. त्यांच्या विरोधात धनंजय मुंडे हे राष्ट्रवादीचे शक्तिमान उमेदवार उभे आहेत. त्यांच्यासाठी अमित शहा यांचीही सभा नुकतीच झाली आहे.
बीड जिल्ह्यातील परळी विधानसभा मतदारसंघ हा भाजपासाठी प्रतिष्ठीत मतदारसंघ आहे. सध्या या मतदारसंघातून महायुतीच्या उमेदवार आणि मंत्री पंकजा मुंडे निवडणूक लढवत आहेत तर त्यांच्याविरोधात महाआघाडीकडून विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे उभे ठाकले आहेत. दोघेही तुल्यबळ उमेदवार आहेत, त्यामुळे भाजपासाठी हा विजय सोपा नसल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः १७ ऑक्टोबर रोजी पंकजा मुंडे यांच्या प्रचारासाठी परळीत येणार आहेत. यापूर्वी दिवंगत अटलबिहारी वाजपेयी हे पंतप्रधान असताना परळीत प्रचारासाठी आले होते.
अटलबिहारी वाजपेयी यांच्यानंतर प्राचारासाठी परळीत येणाऱ्या पंतप्रधान मोदी यांच्या सभेसाठी जय्यत तयारी सुरु आहे. पोलीस प्रशासनाकडून सुरक्षेसाठी विशेष खबरदारी घेण्यात येत आहे. दरम्यान, मोदींच्या सभेसाठी लाखोंची गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेता सुयोग्य जागेची पाहणी करण्यात येत आहे. यासाठी औरंगाबाद परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरिक्षक रविंद्र सिंघल यांनी गोपीनाथ गड आणि वैद्यनाथ कॉलेजसमोरील मैदानाची स्वतः पाहणी केली. याच मैदानात यापूर्वी अटलबिहारी वाजपेयी यांची सभा झाली होती.
आयोजकही वैद्यनाथ कॉलेजमसमोरील जागेसाठीच आग्रही आहेत. दरम्यान, जेसीबीच्या सहाय्याने हे मैदान स्वच्छ करण्याचे कामही सुरु करण्यात आले आहे. त्यामुळे या मैदानावरच मोदींची सभा होईल असे सुत्रांकडून कळते. मात्र, असे असले तरी सभेच्या जागेची अधिकृत घोषणा अद्याप करण्यात आलेली नाही.