महाराष्ट्र विधानसभा २०१९ : चंद्रकांत पाटलांची ठोकाठोकी , म्हणाले : राहुल गांधी परदेशात पळून गेलेत तर पवारांना माझा फटका माहित नाही…

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांना चांगलेच सुनावले. ज्या शब्दात पाटील बोलले त्या शब्दात त्यांना आजवर कुणीच बोलले नाही हे विशेष !! ते म्हणाले कि , मला कोथरुडमध्ये अडकवून ठेवले असा पवारांचा समज आहे. पण तुम्ही या पाटलाला ओळखलेले नाही. मी चेहऱ्यावर कुठलाही भाव ठेवत नाही. मी कसा फटका लगावतो हे समजत नाही. माझा अनुभव तुम्ही घेतलेला नाही’. कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदार संघातील शिवसेनेचे उमेदवार राजेश क्षीरसागर यांच्या शिवसेना-भाजप मेळाव्यात ते बोलत होते. त्यांनी काँग्रेसवरही सडकून टीका करताना भाजपमध्ये बंडखोरांची गय केली जाणार नाही, असा इशाराही दिला.
कोथरुड विधानसभा मतदार संघातून मोठ्या फरकाने विजयी होणार असा विश्वास व्यक्त करत पाटील म्हणाले, ‘या मतदारसंघात काँग्रेस, राष्ट्रवादीला माझ्याविरोधात उमेदवार मिळाला नाही. या मतदारसंघात शरद पवार, अजित पवारांचे डायरेक्ट, इनडायरेक्ट काही तरी चालले आहे. म्हणून अनेकवेळा पराभूत झालेले मनसेचे उमेदवार अॅड . किशोर शिंदे यांना आघाडीने पाठिंबा दिला आहे. या आघाडीत २४ पक्ष आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे अनेक कार्यकर्ते मला भेटत असून ते म्हणत आहेत आम्ही मनसेचा झेंडा का फिरवायचा. कुणाला तरी बळीचा बकरा करायचा म्हणून आघाडीने मनसेला पाठिंबा दिला आहे’.
काँग्रेसला मरणकळा आल्या असताना त्यांना प्राणवायू घालू नका, असे आवाहन त्यांनी बंडखोरांना केले. ते म्हणाले, ‘महाराष्ट्र आणि हरयाणा या दोन महत्वाच्या राज्यांच्या निवडणुका असताना काँग्रेसचे नेते राहुल गांधी परदेशात पळून गेले आहेत. तर दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यात नऊ, राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा २०, कार्याध्यक्ष जे. पी. नड्डा २० सभा तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिवसाला सहा सभा घेत आहेत. पक्षासाठी भाजपचे नेते मोठ्या प्रमाणावर कष्ट घेत आहेत. असे कष्ट घेण्याची काँग्रेसकडे धमक नाही अशा शब्दात त्यांनी टीका केली.