शिवसेनेचा दसरा मेळावा : उद्धव ठाकरेंची टाळी , १० रुपयात देणार जेवणाची थाळी , काँग्रेस -राष्ट्रवादीवर टीकास्त्र

महाराष्ट्रात सर्वत्र दहा रुपयांत चांगल्या जेवणाची थाळी देणार, ३०० युनिटपर्यंतचा विजेचा दर ३० टक्क्यांनी कमी करणार आणि सदृढ महाराष्ट्र घडवण्यासाठी गावोगावी आरोग्य चाचणी केंद्रे उभी करून एक रुपयात हृदयरोग आणि मधुमेह चाचणी केली जाणार, अशा लोकप्रिय घोषणांचा पाऊस शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज शिवतीर्थावरील शिवसेनेच्या ऐतिहासिक दसऱ्या मेळाव्यातून पाडला.
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत यंदा दसरा मेळावा आला. ती संधी साधत शिवसेनेने या मेळाव्यात जोरदार शक्तिप्रदर्शन केलं. शिवाजी पार्क मैदानात राज्यभरातून हजारोंच्या संख्येने आलेल्या शिवसैनिकांच्या साक्षीनेच उद्धव ठाकरे यांनी दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे स्मरण करत विधानसभेवर भगवा फडकवण्यासाठी मी निघालो आहे, अशी गर्जना केली. असा क्वचितच योग येतो. या एकाच महिन्यात दोन विजयादशमी आहेत. आज पहिली विजयादशमी आहे आणि दुसरी येत्या २४ तारखेला निवडणुकीच्या निकालाने साजरी होणार आहे, असा विश्वास उद्धव यांनी व्यक्त केला.
आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत अजित पवार यांना अश्रू अनावर झाले होते. त्यावरून उद्धव यांनी निशाणा साधला. हे मगरीच्या डोळ्यातील अश्रू म्हणायचे का?, असा तिरकस सवाल उद्धव यांनी केला. अजित पवार आता शेती बरी म्हणतात. त्याप्रमाणे शेती करायला हरकत नाही पण धरणात पाणी नसेल तर काय करायचे?, आठवा तुम्ही सत्तेत असताना काय बोलला होता. शेतकरी पाण्यासाठी रडत होता. धरणं कोरडी पडली होती आणि तुम्ही त्यांना कोणतं पाणी दाखवलं होतं, असं विचारताना आज तुमच्या कर्मानेच तुमच्या डोळ्यात पाणी आले आहे, अशा शब्दांत उद्धव यानी तोफ डागली.
काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही पक्ष थकून गेले आहेत आणि भविष्यात हे दोन्ही पक्ष एकत्र येतील, असे विधान काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांनी आज सोलापुरात केले. त्यावर उद्धव यांनी जोरदार टोलेबाजी केली. तुम्ही खाऊन खाऊन थकला आहात आणि म्हणूनच तुम्हाला एकत्र येण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. तरीही एकत्र आल्यावर तुमचा नेता कोण असणार हे आधी ठरवा. ज्यांच्यामुळे काँग्रेस पक्ष सोडला त्या सोनिया गांधींचं नेतृत्व तुम्ही स्वीकारणार आहात का? की पुन्हा एकत्र येऊन भांडत बसणार, असा खोचक सवाल उद्धव यांनी केला. इतक्यात थकू नका, २४ तारखेला आमच्या विजयाचे पेढे खाण्यासाठी ताजेतवाने राहा, असा टोलाही उद्धव यांनी लगावला.
याशिवाय कलम ३७० रद्द करणे हे शिवसेनाप्रमुखांचे स्वप्न होते, ते पूर्ण झाले. आता राममंदिराचे बाळासाहेबांचे स्वप्न आम्ही पूर्ण करणार आहोत. देशात घुसलेल्या बागंलादेशी घुसखोरांना हाकलून लावा. समान नागरी कायदा आणा ही आमची मागणी आहे. जात-पात-धर्म आम्ही काहीही मानत नाही. समान नागरी कायदा केंद्र सरकारने करावा. तो अमलात आणण्यासाठी कोण आडवं येतं त्याला आम्ही पाहू.शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न शिवसेनेने मार्गी लावले आहेत. कर्जमाफी नाही तर कर्जमुक्ती हा आमचा शब्द आहे. शेतकऱ्यांचा सातबारा आम्ही कोरा करणार असेही उद्धव ठाकरे म्हणाले.
दरम्यान महाराष्ट्राचे मुख्यमंत्रिपद मिळवण्याचे स्वप्न शिवसेना पाहत असून आजच्या दसरा मेळाव्यातही पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह सर्वच प्रमुख नेत्यांनी आपल्या भाषणांतून प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे त्याचा उच्चार केला. त्यात शिवसेना नेते व प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी तर पुढच्या वर्षी दसरा मेळाव्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बाजूला बसलेला असेल, असे विधान केले. विशेष म्हणजे आजच्या मेळाव्यात युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे उद्धव यांच्या बाजूला बसले होते. राऊत यांच्या म्हणण्याचा रोख त्याकडेच होता.