सुशीलकुमार शिंदे यांनी व्यक्त केली काँग्रेस -राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाची शक्यता

माजी केंद्रीय गृहमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या भविष्यातील वाटचालीबाबत अत्यंत महत्त्वाचे विधान केले आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही पक्ष आता थकले असून भविष्यात दोन्ही पक्ष एकाच व्यासपीठावर दिसतील, अशी भविष्यवाणी सुशीलकुमार शिंदे यांनी केली.
कधीकाळी आम्ही एकाच आईच्या मांडीवर वाढलो आहोत. इंदिरा गांधी, यशवंतराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम केले आहे. ज्या मुद्द्यावरून राष्ट्रवादीची स्थापना झाली होती तो मुद्दा आता राहिलेला नाही. शिवाय जी खंत आमच्या मनात आहे, तशीच खंत त्यांच्याही मनात असेल. फक्त ते बोलून दाखवत नाहीत, असे नमूद करताना भविष्यात निश्चितच दोन्ही पक्ष एकत्र येतील आणि त्याची सुरुवात खऱ्या अर्थाने आज सोलापुरातून झाली आहे, असे सुशीलकुमार पुढे म्हणाले.
सोलापूर शहर उत्तर मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार मनोहर सपाटे यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन आज सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते झाले. यावेळी सपाटे यांना विजयासाठी शुभेच्छा देताना सुशीलकुमार यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी कशी एकाच आईची दोन मुले आहेत, हे सांगून दोन्ही पक्षांच्या विलीनीकरणाच्या चर्चांना नव्याने फोडणी दिली.
दरम्यान, सुशीलकुमार यांच्यासारख्या काँग्रेसमधील ज्येष्ठ नेत्याने काँग्रेस-राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची शक्यता व्यक्त केल्याने येत्या काळात राजकीय पटलावर नव्या समीकरणांची शक्यता वर्तवली जाऊ लागली आहे. सध्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला उतरती कळा लागली आहे. लोकसभा निवडणुकीत दारूण पराभवाला सामोरं जावं लागल्याने काँग्रेस सावरण्यासाठी धडपडत आहे तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसलाही गळती लागली आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीचे अनेक नेते व आमदार पवारांना रामराम करून भाजप आणि शिवसेनेत गेले आहेत. या पडझडीतून पक्षाला सावरण्यासाठी पवार यांना उतारवयात कंबर कसून मैदानात उतरावं लागलं आहे. पक्षातील मरगळ झटकण्यासाठी पवार राज्याच्या विविध भागांमध्ये दौरे करत आहेत. या स्थितीत दोन्ही पक्ष एकत्र आल्यास किमान महाराष्ट्रात तरी काँग्रेसची ताकद वाढेल, असे जाणकारांचे म्हणणे आहे.