Jalna Crime : एमआयडीसी ठेकेदाराची गोळ्या गाळून हत्या , मोटारसायकल वरून दोन अज्ञात मारेकरी पसार

बदनापूर तालुक्यातील शेलगाव येथे औरंगाबाद- जालना महामार्गावर ऐन बसस्थानकावर एमआयडीसीत ठेकेदार असलेल्या तरुणावर अज्ञात मारेकऱ्यांनी गोळ्या झाडल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला असून तालुक्यात खळबळ उडाली आहे.
तालुक्यातील सेलगाव या ठिकाणी मेनरोडवर सायंकाळी ७.४५ ते ८.१५ दरम्यान बसस्थानकावरील साई पान सेंटर येथे एमआयडीसी मध्ये ठेकेदारी करत असलेल्या संजय अंभोरे (४३) या तरुणावर मोटारसायकल वरून आलेल्या दोन अज्ञातांनी अंभोरे यांच्यावर दोन गोळ्या झाडल्या व पळून गेले. त्या तील एक गोळी संजय अंभोरे यांच्या मानेवर तर दुसरी डोक्यात गेली. अंभोरे हे या गोळीबारात गंभीर जखमी झाले. त्यांना जालना येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल नेण्यात आले असता डॉक्टरानी त्यांना मृत घोषित केले.
या गोळीबारात अंभोरे यांचे निधन झाल्याची बातमी गावात पसरताच गावात सुन्न वातावरण झाले असून संपूर्ण गावकरी संजय अंभोरे यांच्या घरी जमा झाला आहे. या घटनेने सम्पूर्ण गाव हादरून गेलेले असून गावात तणावपूर्ण शांतता आहे. बदनापूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून उशिरापर्यँत कारवाई सुरू होती. अंभोरे हे गावात एक मनमिळावू व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जात होते, त्यांच्या पश्चात आई- वडील, एक भाऊ व 2 मुली असा परिवार आहे. औरंगाबाद- जालना रस्त्यावर सेलगाव हे गाव असून सायंकाळी हा हल्ला झाला असल्यामुळे पोलिसांसमोरही आव्हान आहे.