महाराष्ट्र विधानसभा २०१९ : मी संघाचा कार्यकर्ता, पक्षावर कोणतीही नाराजी नाही, पक्षाचे काम करीत राहील : विनोद तावडे

‘पक्षाने मला तिकीट का नाकारलं याबद्दल चर्चा होईलच. पण माझं काम थांबणार नाही. मी संघाच्या विचारात वाढलोय. समाजाच्या हितासाठी पक्षाला अभिप्रेत काम करत राहणार,’ अशी स्पष्टोक्ती भाजपनेते विनोद तावडे यांनी पत्रकारांशी बोलताना केली.
विनोद तावडे, भाजपचा मुंबईतील एक महत्त्वाचा चेहरा आहेत. मात्र त्यांना पक्षाने विधानसभा निवडणुकीचं
तिकीट नाकारलं आहे. वास्तविक तावडे यांचं नाव पहिल्याच यादीत अपेक्षित होतं. मात्र, दुसऱ्या आणि तिसऱ्या यादीतही त्यांना स्थान मिळालं नाही. शेवटच्या यादीत तरी नाव येईल या आशेवर ते होते. त्यांनी भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचीही भेट घेतली होती. मात्र, आज जाहीर झालेल्या भाजपच्या चौथ्या यादीतही त्याचं नाव नव्हतं. त्यांच्याऐवजी सुनील राणे यांना तिकीट देण्यात आलं. त्यामुळं तावडे यांचा पत्ता कापण्यात आल्याचं स्पष्ट झालं.
उमेदवारी नाकारल्यामुळं तावडे नाराज असल्याची चर्चा होती. मात्र तावडे यांनी ही सर्व चर्चा फेटाळून लावली.
तावडे पुढे म्हणाले की, ‘मी अभाविप आणि संघाच्या विचारात वाढलेला कार्यकर्ता आहे. मला आजपर्यंत बरंच काही मिळालंय. विरोधी पक्ष नेता, आमदार, मंत्री झालो. अनेकांना काहीच मिळत नसूनही ते काम करतात. मीही त्याच भूमिकेतून यापुढं काम करेन. माझ्यासाठी साध्य महत्त्वाचं आहे. त्यामुळं समाजहित डोळ्यापुढं ठेवून पक्षाला अभिप्रेत असं काम करणार,’
उमेदवारी नाकारताना पक्षानं काय कारण दिलं असं विचारलं असता तावडे म्हणाले, ‘याचं नेमकं कारण मला माहीत नाही. पाच वर्षांत भ्रष्टाचाराचा एकही डाग माझ्यावर नाही. पक्षाला माझ्याबद्दल काही कळलं असण्याची शक्यता आहे. माझं काही तरी चुकलं असंही पक्षाला वाटलं असावं. मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांशी माझं खूपच मोकळेपणानं बोलणं होत असतं. निवडणुकीच्या धावपळीत मला उमेदवारीबद्दल कोणाशीच काही बोलता आलेलं नाही. त्याबद्दल पक्षात चर्चा होईलच. कदाचित पक्ष पुन्हा संधी देईल,’ असंही तावडे म्हणाले.