महाराष्ट्र विधानसभा २०१९ : भाजपच्या १४३ उमेदवारांची नावे घोषित , आता ‘गोलिया (जागा ) तीन और आदमी (उमेदवार) छे … !!’

उमेदवारी दाखल करण्यासाठी उद्याचा शेवटचा दिवस असताना आणि भाजपच्या वाट्याला आलेल्या जागा केवळ तीन आणि उमेदवार सहा अशी उर्वरित नेत्यांची अवस्था झाली आहे . दरम्यान भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी भाजपच्या तिसऱ्या यादीत ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचं नाव येण्याची शक्यता वर्तविली असली तरी प्रत्यक्षात तिसऱ्या यादीतही खडसे यांना स्थान देण्यात आलेले नाही.
त्याचबरोबर विनोद तावडे, चंद्रशेखर बावनकुळे, राज पुरोहित आणि प्रकाश मेहता यांचीही नावं या यादीत नसल्याने या नेत्यांचा भाजपने पत्ता कट केल्याचे मानले जात आहे. तसेच भाजपमध्ये दाखल झालेले नारायण राणे यांचे सुपुत्र नितेश राणे यांचंही तिसऱ्या यादीत नाव नसल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
भाजपने आज तिसरी यादी जाहीर केली. त्यात केवळ चार उमेदवारांची नावं आहेत. शिरपूरमधून काशीराम पावरा, रामटेकमधून मल्लिकार्जुन रेड्डी, साकोलीतून परिणय फुके आणि मालाड पश्चिममधून रमेश सिंह ठाकूर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर तिसऱ्या यादीतील चार मिळून एकूण १४३ उमेदवारांची नावं आतापर्यंत जाहीर झाली आहेत.
तिसरी यादी आली तरी त्यात खडसे, तावडे, बावनकुळे, मेहता आणि पुरोहित यांची नाव नसल्याने त्यांच्या राजकीय भवितव्यावर चिंता व्यक्त केली जात आहे. मात्र, खडसे यांनी पक्षाकडून उमेदवारी न मिळण्याची शक्यता पाहून आधीच अपक्ष उमेदवार म्हणून उमेदवारी अर्ज भरला आहे. तर आज सकाळी भाजपमध्ये प्रवेश केलेल्या नितेश राणे यांनाही भाजपने तिकीट दिलेलं नाही. मात्र, त्यांचं नाव शेवटच्या यादीत येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.